Delhi Challan 50 Percent Discount : नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीत राहणाऱ्या नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. दिल्लीत आता वाहतूक नियमांवरून जारी केलेल्या चलानावर केवळ निम्मा दंड भरावा लागणार आहे. दिल्लीचे परिवहन मंत्री कैलाश गेहलोत यांनी या योजनेची घोषणा केली आहे. यासंबंधीचा प्रस्ताव दिल्लीच्या उपराज्यपालांकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.
सार्वजनिक सुविधा लक्षात घेऊन आणि ट्रॅफिक चलनाच्या सेटलमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी, दिल्ली सरकारने मोटार वाहन कायदा, १९८८ च्या विशिष्ट कलमांखाली वाहतूक गुन्ह्यांचा ५० टक्के रकमेवर निपटारा करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ असा की, ज्या लोकांना ट्रॅफिक चलन देण्यात आले आहे, ते चलनाच्या रकमेपैकी निम्मी रक्कम भरून त्यांचे चलन सेटल करू शकतात.
हा प्रस्ताव जलद आणि अधिक सोप्या पद्धतीने वाहतूक चलनाचा निपटारा करण्याच्या उद्देशाने आणण्यात आला आहे. या योजनेंतर्गत, सध्याच्या चालनांसाठी, अधिसूचना जारी झाल्यापासून ९० दिवसांच्या आत चलनाचा निपटारा करावा लागेल. तर अधिसूचनेनंतर जारी केलेल्या चालानांसाठी ही मुदत ३० दिवस ठेवण्यात आली आहे.
वाहतूक चलनाचा निपटारा करण्यात सुलभता येईलया निर्णयामुळे जनतेला वाहतूक चलनाचा निपटारा करण्यात सुलभता येईलच, शिवाय वाहतूक नियमांचे पालन करण्यास प्रोत्साहन मिळेल. यामुळे वाहतूक कायद्यांचा आदर वाढेल आणि रस्त्यावरील सुरक्षितता सुधारेल असा सरकारचा विश्वास आहे.
उपराज्यपालांची मंजुरी मिळताच ही योजना लागू होणारकैलाश गेहलोत म्हणाले की, दिल्लीचे रस्ते सुरक्षित आणि वाहतूक व्यवस्था अधिक चांगली करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. आता या प्रस्तावाला उपराज्यपालांच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. नियमानुसार, परवानगी मिळताच ही योजना लागू केली जाईल. एकंदरीत ही योजना दिल्लीकरांसाठी दिलासा देणारी बातमी असून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी शक्यता आहे.