नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी दिलेला २१ दिवसांचा अंतरिम जामीन संपल्यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी आत्मसमर्पण केले.
तिहार तुरुंगात समर्पण करण्यापूर्वी केजरीवाल यांनी पत्नी सुनीता व आपच्या सहकाऱ्यांसोबत राजघाटावर महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली. त्यानंतर वृद्ध आईवडिलांचे आशीर्वाद घेऊन व कुटुंबीयाला निरोप देत तुरुंगाकडे रवाना झाले.
अंतरिम जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानताना आपण तुरुंगातून पुन्हा कधी बाहेर येऊ आणि तुरुंगात आपल्यासोबत काय होईल हे सांगता येत नाही. शहीद भगत सिंगांप्रमाणे देशाला हुकूमशाहीपासून वाचविण्यासाठी आपली फासावरही चढण्याची तयारी आहे, असे केजरीवाल म्हणाले.
लोकसभा निवडणुकीचा एक्झिट पोल बोगस असल्याचा दावा करताना इंडिया आघाडी २९५ पेक्षा जास्त जागा जिंकेल, असा विश्वास केजरीवाल यांनी व्यक्त केला.