नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर दोघांची ही पहिलीच भेट ठरणार आहे. नॉर्थ ब्लॉकमध्ये होणारी ही एक औपचारिक भेट असल्याचे सांगण्यात येत आहे.
विधानसभा निवडणुकीत उभय नेत्यांनी एकमेकांविरुद्ध जोरदार प्रचार केला होती. अनेक टीका करण्यात आल्या होत्या. अशा परिस्थितीत अमित शाह आणि अरविंद केजरीवाल यांची भेट लक्षवेधी ठरणार आहे.
दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा नसून येथील कायदा व्यवस्था देखील केंद्राच्या अखत्यारित आहे. केजरीवाल यांच्या आधीच्या कार्यकाळात केंद्र सरकार आणि दिल्ली सरकार यांच्यात अनेकदा मतभेद झाले होते. मात्र यावेळी केजरीवाल यांनी केंद्राची मदत घेऊन पुढे जाणार असल्याचे संकेत दिले आहेत.नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत अमित शाह यांनी केजरीवाल यांच्यासह आम आदमी पक्षावर कडाडून टीका केली होती. तसेच शाहीन बागवरून देखील शाह आक्रमक होते. तर केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी सोहळ्यातच केंद्र सरकारला सोबतीला घेऊऩ काम करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आशीर्वादाची गरजही केजरीवाल यांनी व्यक्त केली होती.