एकीकडे भाजपाच्या काही आक्रमक हिंदुत्ववादी नेत्यांच्या वक्तव्यांमुळे देशभरात तणावाचं वातावरण निर्माण होत असताना दुसरीकडे आज दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यासह पक्षाच्या बड्या नेत्यांनी इफ्तार पार्टीला हजेरी लावली. दिल्ली हज कमिटीच्या प्रमुख आणि भाजपाच्या नेत्या कौसर जहां यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या या इफ्तार पार्टीला दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यासह मंत्री प्रवेश वर्मा, मोहनसिंह बिष्ट, माजी मंत्री शाहनवाज हुसेन, खासदार कमलजीत सहरावत, भाजपाचे ज्येष्ठ नेते जफर इस्लाम हे उपस्थित होते. या नेत्यांसह किरेन रिजिजू आणि विधानसभा अध्यक्ष विजेंद्र गुप्ता हेही या या इफ्तार पार्टीला उपस्थित होते.
यावेळी कौसर जहाँ म्हणाल्या की, होळीच्या दुसऱ्याच दिवशी इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे. या पार्टीमध्ये सहभागी होण्यासाठी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता ह्याही उपस्थित राहिल्या. त्यांच्याबरोबरच इतर मंडळीही मोठ्या प्रमाणात सहभागी ढाली आहे. यावरून आपला देश हा प्रेम आणि सद्भावनेच्या सुंदर धाग्यामध्ये बांधला गेला आहे, हे दिसून येतं.
तर रेखा गुप्ता म्हणाल्या की, आमच्या मैत्रिणीकडे आलो आहोत. आम्हाला इथे येऊन खूप चांगलं वाटलं. आपल्या देशात सामाजिक सद्भावना वृद्धिंगत व्हावी आणि प्रगती व्हावी. या देशात सर्वांना स्थान आहे. तसेच सर्वांच्या हृदयातही स्थान आहे. भारत एक मोठा लोकशाहीवादी देश आहे, इथे आम्हा सर्वांना शांतता सौहार्द आणि प्रेमासह पुढे जायचं आहे.