नवी दिल्ली - दिल्लीच्या मुख्य सचिवांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. केजरीवालांच्या निवासस्थानी आपल्याला आम आदमी पक्षाच्या दोन आमदारांनी मारहाण केल्याचा गंभीर आरोप मुख्य सचिव अंशु प्रकाश यांनी केला आहे. सोमवारी रात्री आपण बैठकीसाठी केजरीवालांच्या निवासस्थानी गेलो असताना ही घटना घडल्याचे मुख्य सचिवांनी सांगितले. हा सर्व प्रकार केजरीवालांसमोर घडला.
मुख्य सचिवांनी या प्रकरणी दिल्लीच्या नायाब राज्यपालांची भेट घेऊन तक्रार केली आहे. दरम्यान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कार्यालयाने मुख्य सचिवांचे हे आरोप फेटाळून लावले आहेत. केजरीवालांच्या निवासस्थानी असे काहीही घडले नसल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.
यासंबंधी आज आयएएस अधिका-यांची बैठक होणार असून ते मारहाणीत सहभागी असलेल्या आमदारांवर कारवाईची मागणी करणार आहेत. जाहीरातीसंबंधी चर्चा करण्यासाठी केजरीवालांनी बैठक बोलावली होती. त्यावेळी आमदार अमानतुल्लाह खान यांनी मारहाण केली.
मुख्य सचिव आणि आमदारांमध्ये झालेल्या वादावादीतून हा प्रकार घडला. मुख्य सचिव आपच्या दोन आमदारांविरोधात एफआयआर दाखल करण्याचा विचार करत आहेत.