नवी दिल्ली-
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal)यांनी सोमवारी त्यागराज स्टेडियममध्ये 'देश के मेन्टॉर' (Desh Ke Mentor) योजनेचा शुभारंभ केला. दिल्लीच्या सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी 'देश के मेन्टॉर' योजनेच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री केजरीवाल आणि शिक्षण मंत्री मनिष सिसोदिया उपस्थित होते. दिल्लीतील सरकारी शाळांमधील शिक्षण क्षेत्रात गेल्या काही वर्षांत मोठा बदल झाला आहे. याआधी सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या १६ लाख होती त्यात आता वाढ होऊन १८ लाख इतकी झाली आहे. विशेष म्हणजे आकडेवारी झालेली वाढ इतर राज्यांतून आलेल्या विद्यार्थ्यांची नसून दिल्लीतीलच विद्यार्थ्यांची आहे. सरकारी शाळांमध्ये झालेल्या सुधारणा आणि सुविधांमध्ये वाढ झाल्यानंतर सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे. सरकारी शाळांमध्ये दिलं जाणाऱ्या शिक्षणावर दिल्ली सरकारनं भरपूर काम केलं आहे. शाळेच्या इमारतींसोबतच एकंदर शिक्षण प्रणालीवर दिल्ली सरकारनं महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. त्याचे सकारात्मक परिणाम आता पाहायला मिळत आहेत. पडक्या आणि दुर्लक्षित सरकारी शाळांची आता देशपातळीवर चर्चा केली जाते इतक्या मोठ्या प्रमाणात सरकारी शाळांमध्ये बदल करण्यात आला आहे.
दिल्लीत सुरू करण्यात आलेल्या नव्या योजनेचं अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) यानंही कौतुक केलं आहे. सोनू सूदनं आपल्या ट्विटर हँडलवरुन केजरीवालांचं ट्विट रिट्विट केलं आहे. "चिमुकल्यांना शिक्षण देणं हाच एकमेव उद्देश आहे. त्यांना त्यांच्या स्वप्नांपर्यंत घेऊन जायचं आहे. चला एकत्र मिळून देशातील गरजू विद्यार्थ्यांचे मेन्टॉर बनू. कारण पढेगा इंडिया तभी बढेगा इंडिया", अशा आशयाचं ट्विट सोनू सूद यानं केलं आहे.
दिल्लीच्या शिक्षण प्रणालीत काही अद्भूत बदल केले जात आहेत असं केजरीवालांनी आजच्या कार्यक्रमात संबोधित करताना म्हटलं. दिल्लीच्या शिक्षण प्रणालीची अगदी अमेरिकेत देखील चर्चा केली जाते. हॅपीनेस कार्यक्रमाचं यात मोठं योगदान आहे. दिल्लीच्या शिक्षण क्षेत्रात त्यामुळे एक सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे, असंही केजरीवाल म्हणाले.