AAP Arvind Kejriwal: गेल्या काही दिवसांपासून आम आदमी पक्षाच्या नेत्यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर आता आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्ला खान यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. यानंतर अरविंद केजरीवाल यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले.
मनीष सिसोदिया यांच्याविरोधात कोणतेच पुरावे सापडलेले नाहीत. भाजप आणि पंतप्रधान मोदी आम आदमी पक्षाला संपवण्याचे षडयंत्र करत आहेत. आमच्या आमदारांवर खोट्या FIR दाखल केल्या जात आहेत. खोट्या केसेसमध्ये अडकवून अटक केली जात आहे, अशी टीका अरविंद केजरीवाल यांनी केली. तसेच सर्व कागदपत्रे, फाइल्स तपासण्यात आल्या. एकाही पैशाचा भ्रष्टाचार झालेला नाही. दोन वर्षांपासून आमचे ज्येष्ठ नेते अटकेत आहेत. मनीष सिसोदिया यांच्याविरोधात ईडीकडे कोणताही पुरावा नाही. आमच्या नेत्यांविरोधात खोटे तपास सुरू आहे, या शब्दांत अरविंद केजरीवाल यांनी हल्लाबोल केला.
पंतप्रधान मोदींनी देशाचे वातावरण बिघडवून टाकले आहे
पंतप्रधान मोदी वाणीत आणि कृतीतून अहंकार दिसून येतो. पंतप्रधान मोदी देशाचे वातावरण बिघडवत आहेत. प्रत्येक जण आता त्यांना घाबरायला लागला आहे. मनीष सिसोदिया प्रकरणी न्यायालयाने वारंवार पुराव्याची मागणी केली. मात्र, मनीष सिसोदिया यांच्याविरोधात पुरावे देता आले नाहीत. याचाच अर्थ सर्व केसेस खोट्या आहेत, असा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला.
दरम्यान, आम आदमी पक्षाच्या नेत्यांवर १७० हून अधिक प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. पैकी १४० प्रकरणातील निर्णय आमच्या बाजूने लागलेले आहेत. आधी संजय सिंह यांना अटक केली आणि आता अमानतुल्ला खान यांच्या घरी छापेमारी केली, असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.