Arvind Kejriwal And Nitish Kumar: लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून आता उमेदवार कोण असतील, याबाबत चाचपणी सुरू आहे. विरोधकांनी इंडिया आघाडी स्थापन केली असून, जागावाटपाबाबत निश्चितता आलेली पाहायला मिळत नाही. तसेच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे पंतप्रधान पदाचे उमेदवार असू शकतात, असा कयास बांधला जात आहे. यावरून तर्क-वितर्क केले जात असताना दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी नितीश कुमार यांच्या पंतप्रधान पदाच्या उमेदवारीच्या दाव्याबाबत सूचक विधान केले आहे.
अरविंद केजरीवाल म्हणाले की, आम आदमी पार्टी I.N.D.I.A. युतीसाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे. आम्ही युतीपासून फारकत घेणार नाही. विरोधी आघाडीत जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप तयार नसल्याबाबत थोडा वेळ द्यावा. ते व्हायला हवे. माझ्या मते लवकरच याबाबत काही निश्चिती होईल, असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. नितीश कुमार यांच्या पंतप्रधान पदाच्या दावेदारीबाबत यावेळी अरविंद केजरीवाल यांनी भाष्य केले.
देश सक्षम करायचाय, व्यक्ती नाही
I.N.D.I.A. आघाडीकडून नितीश कुमार यांना पंतप्रधान पदाचा चेहरा बनवण्याच्या चर्चेवर अरविंद केजरीवाल यांनी प्रतिक्रिया दिली. आमची एकच भूमिका आहे. आम्हाला अशी व्यवस्था निर्माण करायची आहे की, या देशातील १४० कोटी जनतेतील प्रत्येक व्यक्तीला पंतप्रधान पदावर असलेली व्यक्ती आपली वाटायला हवी. आपल्याला देशाला आणि देशवासीयांना सक्षम बनवायचे आहे. आम्ही कोणत्याही एका व्यक्तीला सक्षम बनवू इच्छित नाही, असे सूचक विधान केजरीवाल यांनी केले.
दरम्यान, दिल्लीत आम आदमी पक्षाचे सरकार आल्यापासून येथील दोन कोटी जनतेला सोबत घेऊन काम केले जात आहे. केंद्र सरकारच्या सहकार्याने विविध सरकारी संस्थांनी अनेक पावले उचलली आहेत. त्यामुळे गेल्या आठ वर्षांत दिल्लीतील प्रदूषणात लक्षणीय घट झाली आहे. आजची परिस्थिती आदर्श आहे असे म्हणणार नाही. परंतु आपण ज्या मार्गावर आहोत ते योग्य असल्याचे या अहवालावरून दिसून येते. २०११४ च्या तुलनेत यंदा २०२३ मध्ये प्रदूषणात ३० टक्के घट झाली आहे. दिल्लीसाठी ही दिलासादायक बातमी आहे, अशी माहिती अरविंद केजरीवाल यांनी दिली.