गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोना विषाणूनं पुन्हा डोकं वर काढण्यास सुरूवात केली आहे. अशा परिस्थितीत देशातील अनेक राज्यांमध्ये कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतही कोरोनाबाधितांची विक्रमी नोंद होत आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीत कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उपराज्यपाल अनिल बैजल आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पार पडलेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. सोमवारी (आज) रात्री १० वाजल्यापासून ते २६ एप्रिल सकाळपर्यंत हा लॉकडाऊन लागू राहणार आहे. या दरम्यान, विनाकारण बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. तसंच वीकेंड लॉकडाऊनसारखेच यावेळी निर्बंध असतील. एका आठवड्याच्या या लॉकडाऊनदरम्यान दिल्लीत कठोर निर्बंध लागू केले जाणार आहे. केवळ अत्यावश्यक सेवांतील कर्मचाऱ्यांना घराबाहेर पडण्याची परवानगी असेल. तसंच सर्व खासगी कार्यालयांना वर्क फ्रॉम होम करण्याचे निर्देश देण्यात आले असून सरकारी कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांची उपस्थितीही अर्धी असेल. रुग्णालयांमधघ्ये, मेडिकल स्टोअरमध्ये आणि लसीकरणासाठी जाणाऱ्या नागरिकांना यातून सूट देण्यात आली आहे. याशिवाय रेल्वे स्थानक, विमानतळ, बस स्थानकांवर जाणाऱ्यांनाही सूट देण्यात आली आहे. मेट्रो, बस सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून यात केवळ ५० टक्के क्षमतेनं प्रवाशांना प्रवास करता येईल. तसंच दिल्लीतील बँका, एटीएम, पेट्रोल पंप खुली राहतील. याशिवाय सर्व थिएटर्स, ऑडिटोरिअम, स्पा, जिम, स्विमिंग पूल बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या लोकांच्या लग्नाच्या तारखा यापूर्वीच ठरल्या आहेत त्यांना केवळ ५० जणांच्या उपस्थितीत परवानगी देण्यात आली असून यासाठी इ-पास बंधनकारक करण्यात आले आहेत.
Coronavirus Lockdown : दिल्लीत कोरोनाचा कहर; आज रात्रीपासून २६ एप्रिलपर्यंत लॉकडाऊनचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 1:47 PM
गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीत मोठ्या प्रमाणात होत आहे कोरोनाबाधितांची नोंद. २६ एप्रिल सकाळपर्यंत लागू राहणार लॉकडाऊन.
ठळक मुद्देगेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीत मोठ्या प्रमाणात होत आहे कोरोनाबाधितांची नोंद.२६ एप्रिल सकाळपर्यंत लागू राहणार लॉकडाऊन.