नवी दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी विधानसभेत भाषण करताना भाजपवर जोरदार निशाणा साधला. 'दीवार' चित्रपटातील डायलॉग मारत ते म्हणाले की, 'भाजपकडे ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय आहे, पण दिल्लीचे लोक म्हणतात की त्यांच्याकडे त्यांचा मुलगा केजरीवाल आहे.'
दिल्ली केंद्रशासित प्रदेस होणारभाजपवर टीका करताना केजरीवाल म्हणाले, "दिल्लीमध्ये अशी चर्चा आहे की, पुढील विधानसभा निवडणुका होणार नाहीत. कारण, दिल्लीला संपूर्ण केंद्रशासित प्रदेश बनवण्याची योजना आखली जात आहे. पण आपण किती मोठा गुन्हा करणार आहोत, हे या लोकांना माहीत नाही. त्यांच्या भावी पिढ्या या गुन्ह्यासाठी त्यांना शिव्या देतील. केजरीवालांचा द्वेष करताना हे लोक देशाचा द्वेष करू लागले आहेत.''
तपास यंत्रणांवर टीकादीवार या चित्रपटाचा संदर्भ देत केजरीवाल म्हणाले की, ''अमिताभ बच्चन यांचा एक चित्रपट आला होता, दीवार. यात अमिताभ बच्चन म्हणतात, माझ्याकडे संपत्ती आहे, माझ्याकडे बंगला आहे, माझ्याकडे गाडी आहे. याला उत्तर देताना शशी कपूर म्हणतात की, माझ्याकडे आई आहे. आज भाजपवाले धमक्या देतात की, आमच्याकडे ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय आहे. त्याबदल्यात दिल्लीतील जनता म्हणते की, आमच्याकडे मुलगा केजरीवाल आहे.''
भ्रष्टाचार सिद्ध करता आला नाहीसत्येंद्र जैन आणि मनीष सिसोदिया यांच्याबद्दल अरविंद केजरीवाल म्हणाले, ''ते (भाजप) जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत आहेत. अत्यंत प्रामाणिक असलेल्या सत्येंद्र जैन यांना अटक करण्यात आली. पण, ते भ्रष्टाचाराचा आरोप सिद्ध करू शकले नाही. आता ऑगस्टअखेरीस मनीष सिसोदियांना अटक करण्याच्या धमक्या देत आहेत. ते चोर दिसतात का? त्यांनी दिल्लीतील 18 लाख मुलांचे भविष्य घडवले आहे.''