लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: केंद्रात पुन्हा भाजपचे सरकार आल्यास पहिल्या दोन महिन्यांत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्रिपदावरून हटविले जाईल आणि वर्षभरानंतर अमित शाह पंतप्रधान होतील, अशी भविष्यवाणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी वर्तविली.
देशातील सर्व राजकीय नेत्यांना संपविण्यासाठी विरोधी पक्षांच्या सर्व नेत्यांना तुरुंगात पाठवणे आणि भाजपमधील सर्व नेत्यांचे राजकारण संपुष्टात आणून पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘एक देश, एक नेता’ ही मोहीम दोन स्तरांवर राबवीत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. तिहार तुरुंगातून ५१ दिवसांनी बाहेर पडल्यावर शनिवारी त्यांनी आपच्या पक्ष कार्यालयात समर्थकांना संबोधित केले.
‘विरोधकांचे अनेक मंत्री तुरुंगात’
देशात लोकशाही संपवून एकच हुकूमशहा उरला पाहिजे, असा मोदींचा डाव आहे. त्यासाठी ते ‘एक देश, एक नेता’ ही अतिशय धोकादायक मोहीम राबवीत आहेत. आज मनीष सिसोदिया, हेमंत सोरेन, संजय सिंह, सत्येंद्र जैन, असे अनेक मंत्री तुरुंगात आहेत. पुन्हा सत्तेत आल्यास ममता बनर्जी, उद्धव ठाकरे, तेजस्वी यादव, पिनराई विजयन, एम.के. स्टालिन यांच्यासह विरोधी पक्षनेते तुरुंगात असतील, असेही ते म्हणाले.