Delhi CM Arvind Kejriwal News: दिल्ली मद्य घोटाळ्यात अटक करण्यात आलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या अंतरिम जामिनावर बाहेर आहेत. ०२ जून रोजी अरविंद केजरीवाल यांची जामिनाची मुदत संपणार असून, जामीन मुदत वाढवून मिळावी, यासाठी अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका केली आहे. अंतरिम जामिनावर बाहेर आल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी प्रचारसभा, रॅली यांचा धडाका लावला असून, सातत्याने भाजपा आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करताना दिसत आहेत.
अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या जामीन मुदत वाढीच्या याचिकेवरून भाजपा नेत्यांनी टीका केली. या टीकेला केजरीवाल यांनी प्रत्युत्तर दिले. त्यांची तर मनापासूनची इच्छा आहे की, केजरीवालने मरुन जावे. सातत्याने वजन कमी होत आहे. हा गंभीर आजाराचा धोका असू शकतो. ७ किलोहून जास्त वजन कमी झाले आहे. विनाकारण कमी झालेले वजन गंभीर आजारांसाठी धोक्याची घंटा आहे. सीरिअस प्रॉब्लेम होऊ शकतो, यासाठी सर्वोच्च न्यालालयात याचिका दाखल करून अंतरिम जामिनाची मुदत वाढवून मागितली आहे. डॉक्टरांनी अनेक तपासण्या लिहून दिल्या आहेत. त्या करण्यासाठी ७ दिवसांची मुदत मागितली आहे. त्या आठवड्यात सर्व तपासण्या करून घेईन. त्यामुळे काही गंभीर आजार नाही ना, याची खात्री करून घेता येईल, असे अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केले.
पंजाब सरकार पाडण्याची अमित शाह यांची धमकी
अमित शाह यांनी पंजाब सरकार पाडण्याची धमकी दिली असून, ही हुकुमशाही असल्याचा आरोप अरविंद केजरीवाल यांनी यावेळी केला. तुम्ही अमित शाह यांचे भाषण ऐकले का, एकाबाजूला त्यांनी पंजाबी लोकांना अपशब्द बोलले आहेत. तर दुसऱ्या बाजूला ०४ जूननंतर पंजाब सरकार पाडण्याची धमकी दिली आहे. तसेच भगवंत मान मुख्यमंत्री म्हणून राहणार नाहीत, असेही सांगितले आहे. आमच्याकडे ९२ जागा आहेत. तुम्ही सरकार कसे पाडू शकता, अशी विचारणा केजरीवाल यांनी केली आहे.
दरम्यान, नरेंद्र मोदींचा पराभव केला नाही तर देशाची लोकशाही आपण वाचवू शकणार नाही. हा देश हुकूमशाहीकडे वाटचाल करत आहे, असा मोठा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला. एक वेळ उपाशी राहू शकतो, पण हुकूमशाही सहन करणार नाही. इथे माझ्यासाठी नाही तर देशाच्या लोकशाहीच्या रक्षणासाठी आलो आहे. देश वाचवण्याची ताकद मतदारांमध्ये आहे, या शब्दांत अरविंद केजरीवाल यांनी भाजपा आणि पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला होता.