नवी दिल्ली-
दिल्ली सरकारद्वारे आयोजित करण्यात आलेल्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी झेंडावंदन केलं आणि दिल्लीच्या जनतेला संबोधित केलं. गेल्या दोन वर्षांपासून देश आणि संपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत आहे. देशात सध्या तिसरी लाट सुरू आहे पण दिल्लीत खरंतर पाचवी लाट आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका संपूर्ण देशात दिल्लीला बसला आहे, असं केजरीवाल म्हणाले.
केजरीवालांनी यावेळी लवकरच दिल्लीतील निर्बंधांमध्ये सूट दिली जाणार असल्याचीही घोषणा यावेळी केली. "दिल्लीत सध्या ओमायक्रॉनची लाट असली तरी संसर्गाचा दर आता कमी होताना दिसत आहे. निर्बंध लादण्याच्या बाजूनं सरकार अजिबात नाही. पण जनतेचं आरोग्य देखील खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात राहावी यासाठी निर्बंधांचे निर्णय सरकारला घ्यावे लागतात. निर्बंध हटवण्याबाबतचा एक प्रस्ताव काही दिवसांपूर्वी आम्ही उपराज्यपालांकडे दिला होता. त्यातील काही निर्णयांवर त्यांनी सहमती दर्शवली आहे. तर काही फेटाळून लावले. त्यामुळे सोशल मीडियात त्यांच्यावर टीकेची झोड उठवली गेली. पण माझी सर्वांना विनंती आहे की असं करू नका. ते सद्गृहस्थ आहेत आणि जनतेच्या आरोग्याची त्यांना चिंता आहे. जनतेवर निर्बंध लादावेत अशी कुणाचीच इच्छा नसते", असं केजरीवाल यावेळी म्हणाले.
सरकारी कार्यालयांमध्ये आंबेडकर, भगत सिंगांचा फोटो"दिल्लीतील प्रत्येक सरकारी कार्यालयांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शहीद भगत सिंग यांचा फोटो लावण्यात यावा अशी मी घोषणा यावेळी करतो. आम्ही सरकारी कार्यालयांमध्ये राजकीय नेते आणि मुख्यमंत्र्यांचा फोटो यापुढे लावणार नाही", अशी घोषणा अरविंद केजरीवाल यांनी यावेळी केली.