नवी दिल्ली : दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी आम आदमी पक्षाचे (आप) राज्यसभा खासदार संजय सिंह (Sanjay Singh)यांच्या निवासस्थानावर छापा टाकला. याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. 2024 च्या निवडणुका येत आहेत. त्यांना (भाजप) माहित आहे की, ते हरणार आहेत आणि हे त्यांचे हताश प्रयत्न आहेत. जसजशी निवडणूक जवळ येईल तसतशी ईडी आणि सीबीआयसारख्या सर्व एजन्सी सक्रिय होतील, असे अरविंद केजरीवाल म्हणाले.
अरविंद केजरीवाल म्हणाले, "गेल्या एक वर्षापासून आम्ही पाहत आहोत की कथित मद्य घोटाळ्याबाबत आवाज उठत आहेत. 1000 हून अधिक छापे टाकण्यात आले, परंतु एक पैसाही जप्त झालेला नाही. ते फक्त घोटाळ्याचे आरोप करत राहतात. खूप चौकशी केली. पण काही सापडले नाही. वर्षभरापासून तथाकथित मद्य घोटाळ्याची चौकशी सुरू असून आजतागायत काहीही निष्पन्न झालेले नाही. संजय सिंह यांच्या ठिकाणीही काहीही सापडणार नाही. निवडणुका येत आहेत आणि 2024 च्या निवडणुकीत हे लोक पराभूत होत आहेत, असे त्यांना वाटते. त्यामुळे हरलेल्या माणसाचा हा शेवटचा हताश प्रयत्न असल्याचे दिसते. काल पत्रकारांवर कारवाई झाली आणि आज संजय सिंह यांच्यावर कारवाई झाली. निवडणुकीपर्यंत थांबा, कदाचित तुमच्याही बाबतीत असे होईल."
दुसरीकडे, आप खासदार संजय सिंह यांच्या निवासस्थानावर ईडीच्या छाप्याबाबत दिल्लीच्या मंत्री आणि आप नेत्या आतिशी म्हणाल्या, "त्यांनी ईडी आणि सीबीआयचे शेकडो अधिकारी तैनात केले आहेत. लोकांना अटक करून अत्याचार केले. मात्र, केंद्र सरकार आणि त्यांच्या एजन्सींना आजवर एक रुपयाचाही भ्रष्टाचार सिद्ध करता आलेला नाही. यावरून भाजपला 'आप'ची भीती वाटत असल्याचे दिसून येते. आगामी लोकसभा निवडणुकीत आपण हरणार आहोत हे पंतप्रधान मोदींना माहीत असल्याचे यावरून दिसून येते. या पराभवाच्या भीतीने ते आप नेते आणि पत्रकारांवर छापे टाकत आहेत. संजय सिंह यांच्याकडून भ्रष्टाचाराचा एक पैसाही त्यांना मिळणार नाही, हे मी विश्वासाने सांगू शकतो."
दरम्यान, दिल्ली मद्य घोटाळ्या प्रकरणी ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये तीन ठिकाणी संजय सिंह यांच्या नावाचा उल्लेख आहे. मात्र आतापर्यंत ईडीकडून याबाबत कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. तसेच, हे छापे कोणत्या प्रकरणात मारण्यात आले, याबाबतही ईडीकडून कुठलंही अधिकृत वक्तव्य समोर आलेले नाही. दरम्यान, मद्य धोरण घोटळ्या प्रकरणी मनीष सिसोदिया हे तुरुंगात आहेत. मनीष सिसोदिया यांना यावर्षी फेब्रुवारी महिन्यात सीबीआयकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर मद्य घोटाळ्यामध्ये मनी लाँड्रिंगचा तपास करत असलेल्या ई़डीने त्यांना अटक केली होती. तेव्हापासून सिसोदिया तुरुंगात आहेत.