नवी दिल्ली - देशाची राजधानी दिल्लीची पुन्हा एकदा कमान महिलेच्या हाती गेली आहे. आम आदमी पक्षाच्या बैठकीत नव्या मुख्यमंत्रिपदासाठी अतिशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. आज आपच्या आमदारांची बैठक पार पडली त्यात अतिशी मार्लेना यांची सभागृह नेतेपदी निवड करण्यात आली. अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाची धुरा सोडल्यानंतर दिल्लीत नवीन मुख्यमंत्री कोण अशी चर्चा सुरू होती. त्यात अतिशी यांचं नाव पुढे आले आहे.
नव्या मुख्यमंत्रिपदाच्या निवडीसाठी अरविंद केजरीवाल यांच्या घरी सर्व आमदारांची बैठक झाली. आज मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे राजीनामा देतील त्यानंतर अतिशी या नव्या मुख्यमंत्री म्हणून दिल्लीचा कार्यभार सांभाळतील. संध्याकाळी ४.३० वाजता केजरीवाल उपराज्यपाल विनय सक्सेना यांची भेट घेऊन त्यांना राजीनामा सुपूर्द करतील. त्यानंतर नव्या मुख्यमंत्रिपदासह इतर मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडेल. आमदारांच्या बैठकीत अरविंद केजरीवाल यांनी अतिशी यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला त्यावर सर्वांनी एकमताने मंजुरी दिली.
सुनीता केजरीवाल यांच्या नावाची होती चर्चा
अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल मुख्यमंत्री बनतील अशी चर्चा होती. मात्र केजरीवालांची राजकीय कारकिर्द पाहता ते सुनीता केजरीवालांना मुख्यमंत्री बनवणार नाहीत. ते त्यांच्या मंत्रिमंडळातील अनुभवी अथवा इतर सहकाऱ्याला मुख्यमंत्री बनवू शकतात असं आप पक्षाचे नेते सौरभ भारद्वाज यांनी म्हटलं होते.
अतिशी दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री
दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून अतिशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. सुरुवातीपासून त्यांचे नाव आघाडीवर होते. अतिशी या पंजाबी राजपूत कुटुंबातून येतात आणि त्यांनी ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटीतून पदवीचं शिक्षण पूर्ण केले आहे. २०२० साली अतिशी पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीत आमदार म्हणून निवडून आल्या. त्यानंतर २०२३ साली त्या केजरीवाल सरकारमध्ये मंत्री झाल्या. आता वर्षभरातच त्यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची सूत्रे आली.
अतिशी या केजरीवाल यांच्या विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक आहेत. अण्णा हजारे यांच्या आंदोलनापासून त्या संघटनेत सक्रीय आहेत. सध्या त्यांच्याकडे सर्वाधिक मंत्रालयाचा कारभार होता. केजरीवाल जेव्हा जेलमध्ये गेले तेव्हापासून संघटना ते सरकार सर्व पातळीवर त्यांनी मोर्चा सांभाळला. मुख्यमंत्रिपदासाठी ज्या नावांची चर्चा होती त्यात कैलाश गहलोत, गोपाल राय आणि सौरभ भारद्वाज यांच्याही नावाची चर्चा होती.