काँग्रेसला आघाडीसाठी वारंवार विचारुन थकलो - अरविंद केजरीवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2019 12:18 PM2019-02-21T12:18:41+5:302019-02-21T12:26:45+5:30
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसला आघाडीसाठी वारंवार विचारुन थकलो पण काँग्रेस प्रतिसाद देत नसल्याचं म्हटलं आहे.
नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसला आघाडीसाठी वारंवार विचारुन थकलो पण काँग्रेस प्रतिसाद देत नसल्याचं म्हटलं आहे. दिल्लीतील चांदणी चौकात बुधवारी (20 फेब्रुवारी) एका सभेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी केजरीवाल यांनी हे म्हटलं आहे. 'आज काँग्रेससोबत जर आमची आघाडी झाली तर भाजपा दिल्लीतील सर्व जागा हारेल त्यामुळे काँग्रेसला आघाडीसाठी तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, यासाठी त्यांनी नकार दिला आहे. काँग्रेसला वारंवार विचारुन मी आता थकलो आहे, मला कळतच नाही की त्यांच्या मनात काय सुरू आहे, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.
लोकसभा निवडणुकीत समविचारी पक्षांच्या मतांमध्ये विभागणी होऊ नये यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल बेचैन झाले आहेत. तसेच काँग्रेसने उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीमध्ये फूट पाडली आहे. काँग्रेस दुसऱ्या पक्षांना कमजोर करीत असल्याचा आरोपही केजरीवाल यांनी केला आहे. त्यामुळे दिल्लीच्या सर्व जागांवर आम आदमी पार्टी एकट्यानेच निवडणूक लढवणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली आहे.
Delhi CM in Chandni Chowk y'day: There should be only 1 candidate against every BJP candidate,votes must not be divided.Tired of trying to convince Congress for alliance,but they refuse to understand. If today our alliance with Congress is done, BJP will lose all 7 seats in Delhi pic.twitter.com/6LG5rNGnZB
— ANI (@ANI) February 21, 2019
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय राजधानी क्षेत्र असलेल्या दिल्लीमधील बहुतांश अधिकार केंद्र सरकारला देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर जोरदार टीका केली होती. 'जर अशा एखाद्या अधिकाऱ्याची नियुक्ती केली गेली जो आमचे म्हणणे ऐकतच नसेल तर मोहल्ला क्लीनिक कसे चालू राहील. जर कुणी या व्यक्तीने भ्रष्टाचार केला आहे, असे सांगितले तर मी काय करू? मी भाजपवाल्यांना सांगू का की या प्रकरणात लक्ष घाला म्हणून. हे सारे भाजपाकडूनच केले जात आहे. हा निर्णय संविधान आणि लोकशाहीच्या विरोधात आहे' असे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर टीका करताना अरविंद केजरीवाल यांनी म्हटले होते. तसेच 'यावेळी तुम्ही पंतप्रधान बनवण्यासाठी मतदान करू नका, तर दिल्लीला संपूर्ण राज्याचा दर्जा मिळवून देण्यासाठी मतदान करा. येथील जनतेला त्यांचा अधिकार मिळाला पाहिजे. तुम्ही दिल्लीमधील सातही जागा आपच्या पारड्यात टाका, म्हणजे आम्ही संसदेत लढून दिल्लीला संपूर्ण राज्याचा दर्जा देण्यासाठी सरकारला भाग पाडू' असेही केजरीवाल यांनी सांगितले होते.