दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सध्या तिहार जेलमध्ये आहेत. अटक झाल्यापासून केजरीवाल यांचं वजन 4.5 किलोने कमी झालं असून डॉक्टरांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे असं आपचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे अरविंद केजरीवाल यांना येथे आणलं तेव्हा त्यांचं वजन 55 किलो होतं आणि आताही त्यांचं वजन 55 किलो आहे, असं तिहार तुरुंग प्रशासनाने म्हटलं आहे. तिहार प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, "तुरुंगात दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांची प्रकृती ठीक आहे, त्यांची शुगर लेव्हल नॉर्मल आहे."
"आज सकाळीही त्यांनी योगा केला, ध्यानधारणा केली. जेलमधील डॉक्टरांनी त्याच्या प्रकृतीबाबत सध्या कोणतीही चिंता व्यक्त केलेली नाही." अरविंद केजरीवाल यांना ईडीने 21 मार्च रोजी दिल्ली दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली होती. 1 एप्रिल रोजी त्यांना 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली त्यानंतर ते तिहार जेलमध्ये आहे. दिल्लीच्या मंत्री आतिशी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर य़ाबाबत एक पोस्ट केली आहे.
"अरविंद केजरीवाल यांना गंभीर डायबीटीस आहे. आरोग्याच्या समस्या असतानाही ते 24 तास देशसेवेत तत्पर राहिले. अटक झाल्यापासून अरविंद केजरीवाल यांचे वजन 4.5 किलोने कमी झाले आहे. हे खूप चिंताजनक आहे. आज त्यांना तुरुंगात टाकून भाजपा त्यांचे आरोग्य धोक्यात आणत आहे. अरविंद केजरीवाल यांना काही झाले तर संपूर्ण देश सोडा, देवही त्यांना माफ करणार नाही" असं आतिशी यांनी म्हटलं आहे.
अरविंद केजरीवाल यांची ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवण्यासाठी त्यांना औषधे देण्यात आली आहेत. तुरुंग अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ब्लड शुगर लेव्हल मॉनिटरिंग करण्यासाठी शुगर सेन्सर देखील देण्यात आला आहे. ते दुपारी आणि रात्रीच्या जेवणात घरी बनवलेले अन्न खात असून त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले जात आहे. पत्नी सुनीता यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे देखील ते बोलले आणि त्यांच्या वकिलाला देखील भेटले.