नितीन नायगावकर
नवी दिल्ली - दिल्ली सरकारने सम-विषम नियमांची घोषणा केल्यावर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. अनेकांनी त्याचे दुष्परिणामही सांगितले. मात्र, आज (गुरुवार) अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील मुख्यमंत्र्यांच्या वाहनालाही सम-विषम नियमांमधून सूट नसल्याचे घोषित केल्यामुळे विरोधी पक्षाच्या नेत्यांना शॉक बसला आहे.
दिल्लीमध्ये ४-१५ नोव्हेंबर या कालावधीत वाहनांसाठी सम-विषम नियम लागू होणार आहेत. त्यासंदर्भात अरविंद केजरीवाल यांनी आज पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष, राज्यसभा उपाध्यक्ष, राज्यपाल, सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश व न्यायाधीश, केंद्रीय मंत्री आदींची वाहने नियमांच्या कक्षेत नसतील. तसेच रुग्णवाहिका, अग्नीशामक वाहने, सुरक्षा विभागाची वाहने, दूतावासाची वाहने, दिव्यांग यांनाही यातून वगळण्यात आले आहे. मात्र, त्याचवेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, दिल्ली सरकारमधील सर्व मंत्री, दिल्लीतील खासदार, आमदार आणि अधिकाऱ्यांच्या वाहनांना नियमांमधून सूट नसल्याचे केजरीवाल यांनी स्पष्ट केले.
शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या वाहनांनाही यातून सूट देण्यात आली आहे. यामध्ये बससह सर्व परवानाधारक ‘स्कूल व्हेइकल्स’चा समावेश आहे. पण, या वाहनांना केवळ शाळा सुरू होण्याच्या व सुटण्याच्या वेळेतच फिरण्याची परवानगी असणार आहे, असेही केजरीवाल म्हणाले. राजधानीतील वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी या योजनेची अंमलबजावणी होत आहे. या योजनेत दुचाकी वाहनांनाही मोकळीक देण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना ४ हजार रुपये दंड केला जाणार आहे. यापूर्वी दंडाची रक्कम २ हजार रुपये होती, हे विशेष.
नियमांच्या कक्षेत
- मुख्यमंत्री
- उपमुख्यमंत्री
- दिल्ली सरकारचे मंत्री
- खासदार
- आमदार
नियमांमधून सूट
- महिला
- शाळकरी विद्यार्थी
- रुग्णवाहिका
- दुचाकी
- दिव्यांग
‘चोवीस तासांत खड्डे बुजवणार’
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अख्त्यारित येणाऱ्या रस्त्यांवरचे खड्डे येत्या चोवीस तासांत बुजविण्यात येतील, अशी माहिती केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली. दिल्लीतील १ हजार २६० किलोमीटरच्या रस्त्यांवर २३२ खड्डे असल्याचे अलीकडेच निरीक्षणात आढळले आहे. हे सर्व खड्डे येत्या चोवीस तासांत बुजविण्यात येतील. २८३ ठिकाणी रस्त्यांची डागडुजी आवश्यक आहे. हे काम ३१ ऑक्टोबरपूर्वी पूर्ण होईल. तर ज्याठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत, ती नोव्हेंबरच्या अखेरीसपर्यंत पूर्ण करण्यात येतील.