नवी दिल्ली - दिल्लीमध्ये भाजपला धूळ चारून दणदणीत विजय मिळविलेल्या आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांचा शपथविधी आज (16 फेब्रुवारी) रामलीला मैदानावर झाला. दिल्लीतील सामान्य जनतेला या सोहळ्यासाठी खास आमंत्रित करण्यात आले असून त्यांच्या साक्षीने हा सोहळा संपन्न झाला. छोट्या मफलर मॅनसह मोठ्या संख्येने दिल्लीकरांनी शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली होती. आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. रामलीला मैदानात त्यांच्यासोबत मंत्रिमंडळातील सहा मंत्र्यांनीही पदाची आणि गोपनियतेची शपथ घेतली.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळात गोपाल राय, मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन, कैलाश गेहलोत, राजेंद्र पाल गौतम, इमरान हुसैन यांचा समावेश आहे. या सहा मंत्र्यांनी आज रामलीला मैदानावर शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर केजरीवाल यांनी शपथविधी सोहळ्यासाठी जमलेल्या जनतेलाही संबोधित केलं. 'हा माझा नव्हे, प्रत्येक दिल्लीकराचा विजय आहे. मी प्रत्येकासाठी काम करणार' असं सांगत केजरीवाल यांनी 'हम होंगे कामयाब.... नही डर किसी का आज' असं म्हटलं आहे.
'हा फक्त माझा विजय नाही तर हा प्रत्येक दिल्लीकराचा विजय आहे, दिल्लीतल्या प्रत्येक कुटुंबाचा विजय आहे. दिल्लीकरांच्या आयुष्यात आनंद आणि गोडवा आणण्यासाठी आम्ही गेल्या पाच वर्ष प्रयत्न केले. तसेच मी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही या शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण दिलं होतं. परंतु दुसऱ्या कार्यक्रमात व्यग्र असल्यानं ते येथे उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांनी आशीर्वाद द्यावा ही अपेक्षा आहे' असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे.
रामलीला मैदानावर प्रचंड गर्दी झाली होती. 'केजरीवाल सर्व काही मोफत देत आहेत असं म्हणत काही लोक माझ्यावर टीका करतात. मात्र जगातील मौल्यवान गोष्टी मोफत मिळाव्यात याची सोय निसर्गाने केली आहे. मग ते आईचं प्रेम असो, वडिलांचे आशीर्वाद असो किंवा श्रावण कुमारचं समर्पण... केजरीवाल जनतेवर प्रेम करतो त्यामुळे त्याचं प्रेमही मोफत आहे' असं देखील केजरीवाल यांनी म्हटलं आहे. शपथविधी सोहळ्याला दिल्लीचा कारभार करताना गेल्या पाच वर्षांमध्ये महत्त्वाचं योगदान देणाऱ्या विविध क्षेत्रांतील 50 जणांना आमंत्रित करण्यात आलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या
Delhi CM Oath Ceremony Live : आमंत्रणानंतरही पंतप्रधान मोदी शपथविधीला अनुपस्थित; केजरीवाल म्हणाले...
...म्हणून पंतप्रधान मोदींनी पाठवलं रिक्षा चालकाला पत्र
शरद पवारांकडून नाशिक दौरा अचानक रद्द; उद्या १६ मंत्र्यांची महत्त्वाची बैठक
भाजपा नेते गिरीराज सिंह म्हणतात, पंतप्रधान म्हणजे देवाचे अवतार
China Coronavirus : जगभरात ६७ हजार लोकांना कोरोनाचा संसर्ग; तब्बल १६०० बळी