नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा मोठी राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहे. पीडब्ल्यूडीने 6 फ्लॅग स्टाफ रोड येथील मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान सील केले आहे. विभागाने बंगल्याच्या गेटला दोन कुलूपही लावले आहेत. अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर हे सरकारी निवासस्थान रिकामे करण्यात आले होते. आतिशी मुख्यमंत्री झाल्यानंतर या घरात राहायला आल्या, पण आता अचानक पीडब्ल्यूडीने हे घर सील केले आहे.
मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान रिकामे करणे आणि हस्तांतरित करण्याबाबत वाद आहे, त्यामुळेच पीडब्ल्यूडीने ही कारवाई केली आहे. याशिवाय पीडब्ल्यूडीचे दोन विभाग अधिकारी आणि दिल्लीच्या दक्षता विभागातील अरविंद केजरीवाल यांचे माजी विशेष सचिव यांना योग्य हस्तांतरित करण्यासाठी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. दरम्यान, पीडब्ल्यूडीच्या कारवाईनंतर आम आदमी पक्षाने उपराज्यपालांवर आरोप केले. उपराज्यपालांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री आतिशी यांचे सर्व सामान मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून बाहेर काढल्याचा आरोप आपने केला आहे.
दिल्ली विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजेंद्र गुप्ता यांनी मुख्यमंत्र्यांवर बेकायदेशीरपणे बंगल्याचा ताबा घेतल्याचा आरोप केला आणि तो सील करण्याची मागणी केली. तर, दिल्ली भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा म्हणाले की, अरविंद केजरीवाल, अखेर तुमच्या पापांचे भांडे भरले आहे. तुमचा भ्रष्ट शीशमहल अखेर सील करण्यात आला आहे. आज सकाळीच भाजपने भ्रष्ट शीशमहल सील करण्याची मागणी केली होती.
ज्या बंगल्याचा प्लॅन पास झालेला नव्हता, ज्याला एनओसी मिळालेली नव्हती, त्यात तुम्ही कसे राहात होता? चोर दरवाज्याने तुम्ही नवीन मुख्यमंत्र्यांना घुसवण्याचा प्रयत्न करत होता. त्या बंगल्यात कोणती गुपिते दडवली आहेत. सरकारी खात्याला बंगल्याची चावी न देता, आत घुसण्याचा प्रयत्न करत आहात. संपूर्ण दिल्ली हे पाहत आहे. दिल्लीतील या शीशमहलमधील बंगला आता सील करण्यात आला आहे आणि मला आशा आहे की त्याची सखोल चौकशी केली जाईल, अशी टीका त्यांनी केली.
आतिशी सोमवारीच मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी राहायला गेल्यादिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी सोमवारी सामानासह उत्तर दिल्लीतील सिव्हिल लाइन्स भागात असलेल्या बंगल्यात शिफ्ट झाल्या होत्या. या बंगल्यात अरविंद केजरीवाल आपल्या कुटुंबासह 9 वर्षांपासून राहत होते. मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी ते रिकामे केले होते. बुधवारी आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी पत्रकार परिषदेत आतिशीला बंगला अद्याप दिला नसल्याचा आरोप करत भाजप बंगला बळकावण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. बंगल्याच्या परिसरात असलेले मुख्यमंत्र्यांचे कॅम्प ऑफिस रिकामे करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला.