नवी दिल्ली-
दिल्लीसह देशातील सर्वच राज्यांमध्ये उष्णतेचा कहर सुरूच आहे. सध्या वाढत्या उष्णतेमुळे विजेची मागणीही झपाट्याने वाढली आहे. मात्र या सगळ्यात दिल्लीसह देशातील अनेक राज्यांमध्ये कोळसा संकटाच्या बातम्याही समोर येत आहेत. कोळशाच्या तुटवड्यामुळे दिल्लीसह १२ राज्यांना वीज संकटाचा सामना करावा लागत आहे. या सर्व परिस्थितीमध्ये दिल्ली सरकारनं राजधानीला वीजपुरवठा करणाऱ्या वीज प्रकल्पांमध्ये कोळशाचा तुटवडा असल्याचा इशारा दिला आहे. अशा परिस्थितीत मेट्रो ट्रेन आणि रुग्णालयांसह सर्व महत्त्वाच्या संस्थांना वीजपुरवठा करण्यात अडचण येऊ शकते.
दिल्लीचे ऊर्जा मंत्री सत्येंद्र जैन यांनी या परिस्थितीबाबत तातडीची बैठक बोलावली आहे. यासोबतच सत्येंद्र जैन यांनी केंद्र सरकारला पत्र लिहून पुरेसा कोळसा पुरवठा करण्याची मागणी केली आहे. जेणेकरून वीज केंद्राला कोळसा उपलब्ध करून त्यांच्याकडून दिल्लीला वीजपुरवठा करता येईल.
दिल्लीतील दादरी पॉवर प्लांटमधून सर्वाधिक वीजदादरी, उंचाहर, कहलगाव, फरक्का आणि झज्जर पॉवर प्लांटमधून दररोज 1,751 मेगावॅट वीज दिल्लीला पुरवली जाते. दिल्लीला सर्वाधिक पुरवठा (728 MW) दादरी-II पॉवर प्लांटमधून केला जातो. त्याचबरोबर उंचाहार येथून 100 मेगावॅट वीजपुरवठा केला जातो. नॅशनल पॉवर पोर्टलच्या डेली कोल रिपोर्टनुसार, या सर्व पॉवर प्लांटमध्ये कोळशाचा तुटवडा आहे.
"दादरी-II आणि उंचाहर पॉवर स्टेशनमधून वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे, दिल्ली मेट्रो आणि सरकारी रुग्णालयांसह अनेक अत्यावश्यक संस्थांना 24 तास वीज पुरवठ्यात समस्या निर्माण होऊ शकते", असं दिल्ली सरकारनं जारी केलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे.