नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. दिल्लीकाँग्रेस अध्यक्ष अरविंदर सिंग लवली यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसचे प्रभारी सरचिटणीस दीपक बाबरिया यांच्याशी मतभेद झाल्याने अरविंदर सिंग लवली यांनी पदाचा राजीनामा दिल्याचे सांगण्यात येत आहे.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे अरविंदर सिंग लवली यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला आहे. यामध्ये त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी राजीनामा पत्रात लिहिले आहे की, काँग्रेसवर खोटे, बनावट आणि दुर्भावनापूर्ण भ्रष्टाचाराचे आरोप करण्याच्या एकमेव आधारावर स्थापन झालेल्या पक्षासोबत आघाडी करण्याच्या विरोधात दिल्ली काँग्रेस युनिट होती. असे असतानाही पक्षाने दिल्लीत 'आप'सोबत आघाडी करण्याचा निर्णय घेतला.
ऑगस्ट 2023 मध्ये जेव्हा आपल्याकडे कार्यभार सोपवण्यात आला तेव्हा पक्षाच्या युनिटची स्थिती सर्वांना माहीत आहे. तेव्हापासून विविध उपाययोजना करून पक्षाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आणि स्थानिक कार्यकर्त्यांना पुन्हा उत्साही करण्यासाठी कठोर परिश्रम घेतले आहेत, असे अरविंदर सिंग लवली यांनी म्हटले आहे. तसेच, पक्ष सोडून गेलेल्या किंवा निष्क्रिय झालेल्या शेकडो स्थानिक कार्यकर्त्यांना आणि स्थानिक नेत्यांना पक्षात पुन्हा सामील करून घेतले, असेही अरविंदर सिंग लवली यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे.