नवी दिल्ली - दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने शासनाच्या विविध विभागाच्या वेबसाईट्स हॅक करून त्याद्वारे सामाजिक द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आयएसआय पुरस्कृत हॅकर्सचे जाळं उद्ध्वस्त केले आहे. अशा प्रकारची ही पहिलीच मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी दोन काश्मिरी तरुणांना अटक करण्यात आली आहे. लष्करी गुप्तचर विभागाकडून माहिती मिळाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी अतिरिक्त डीसीपी के. पी. एस मल्होत्रा यांच्या नेतृत्वाखालील एक विशेष पथक स्थापन करून माहिती गोळा केली आणि संशयितांचा शोध घेतला.
अटक करण्यात आलेले दोघंही 'टीम हॅकर्स थर्ड आय' या राष्ट्रविरोधी हॅकिंग ग्रुपचे सदस्य आहेत. अटक करण्यात आलेल्या दोन तरुणांपैकी शाहिद मल्ला हा बीटेकचा विद्यार्थी आहे, तर दुसरा अदील हुसेन हा पंजाबमधील एका विद्यापीठाचा बीसीएचा विद्यार्थी आहे. या दोघांवर भारतातील 500 वेबसाइट्स हॅक केल्याचा आरोप आहे. जानेवारी महिन्यात या दोघांनीच जम्मू-काश्मीर बँकेची वेबसाइटही हॅक केली होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. लाहोर आणि दुबईतून काम करणाऱ्या या समूहानं 2016 पासून हजारो भारतीय संकेतस्थळे हॅक केल्याचा संशय आहे.