Jammu and Kashmir Assembly polls : नवी दिल्ली : टेरर फंडिंग प्रकरणात दिल्ली कोर्टाने खासदार इंजिनिअर रशीद यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे. पटियाला हाऊस कोर्टाने त्यांना २ ऑक्टोबर २०२४ पर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. आगामी जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी रशीद यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यांनी ३ महिन्यांचा अंतरिम जामीन मागितला होता. सध्या त्यांच्या नियमित जामीन अर्जावरील आदेश प्रलंबित आहे.
इंजिनिअर रशीद या नावानं ओळख असलेले शेख अब्दुल रशीद यांनी तुरुंगात असतानाच जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांचा लोकसभा निवडणुकीत बारामुल्लामधून मोठ्या फरकाने पराभव केला होता. रशीद यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवून विजय मिळवला होता. आता त्यांच्या नेतृत्वाखालील अवामी इत्तेहाद पार्टी (एआयपी) आगामी जम्मू-काश्मीरची विधानसभा निवडणूक लढवणार आहे.
इंजिनिअर रशीद यांचा मुलगा अबरार रशीद, ज्यांनी लोकसभा निवडणुकीत इंजिनिअर रशीद यांचा प्रचार केला होता, ते एआयपीच्या निवडणूक प्रचाराचे नेतृत्व करत आहेत. आगामी जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी रशीद यांनी कोर्टाकडे जामीन मागितला होता. दरम्यान, याआधी रशीद यांना लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर शपथ घेण्यासाठी ५ जुलै रोजी कोर्टाने कस्टडी पॅरोल दिला होता.
कोण आहेत अब्दुल राशीद शेख?रशीद २०१९ पासून तुरुंगात आहेत, जेव्हा त्यांना एनआयएनं २०१७ च्या टेरर फंडिंग प्रकरणात अटक केली होती. रशीद हे दिल्लीच्या तिहार तुरुंगात आहेत. जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी गट आणि फुटीरतावाद्यांना निधी पुरवल्याच्या आरोपाखाली एनआयएने अटक केलेल्या काश्मिरी व्यापारी जहूर वतालीच्या चौकशीदरम्यान त्यांचे नाव पुढे आले होते. दरम्यान, राशीद यांनी २००८ आणि २०१४ मध्ये लांगेट विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला होता. मात्र, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं.