Delhi CM Arvind Kejriwal News: तिहार कारागृहात असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची याचिका दिल्लीतील न्यायालयाने फेटाळून लावली आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून डॉक्टरांचा सल्ला घेण्याबाबत अरविंद केजरीवाल यांनी एक याचिका दाखल केली होती. दिल्ली न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहे.
न्यायालयाने तिहार जेल प्रशासनाला इन्शुलिन देण्याचे निर्देश द्यावेत. तसेच दररोज १५ मिनिटे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून डॉक्टरांचा सल्ला घेण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. मात्र, सदर याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. जेल प्रशासन आवश्यक ती औषधे देत नाहीत. अरविंद केजरीवाल यांना मधुमेहाचा त्रास असून, त्यांना मुद्दामहून इन्शुलिन दिले जात नाही, असा आरोप आम आदमी पक्षाकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल यांना जेल प्रशासनाला एक पत्र लिहिल्याचे सांगितले जात आहे.
अरविंद केजरीवाल यांनी पत्रात नेमके काय म्हटले आहे?
मीडियाला तुमच्याकडून जी प्रतिक्रिया दिली गेली, ती वाचली. मला वाईट वाटले. तिहार तुरुंग प्रशासनाचे पहिले वक्तव्य-अरविंद केजरीवाल यांनी कधीही इन्शुलिनचा मुद्दा उपस्थित केला नाही. मात्र हे संपूर्णपणे खोटे आहे. दहा दिवस काय रोज माझ्या इन्शुलिनची आठवण करून देत आहे. डॉक्टर बघायला आले की, त्यांना सांगतो की, माझी शुगर लेव्हल वाढली आहे. ग्लुको मीटरवरचे रिडिंग बघावे. ग्लुको मीटरही डॉक्टरांना दाखवले. माझी शुगर लेव्हल २५० ते ३२० पर्यंत वाढली आहे तर फास्टिंग शुगर १६० ते २०० च्या पातळीवर जाते आहे. रोज इन्शुलिन द्या अशी मागणी केली आहे. तरीही मी तुम्ही असे खोटे वक्तव्य कसे काय करु शकता? अशी विचारणा अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.
दरम्यान, एम्सच्या डॉक्टरांनी सांगितलं की चिंतेचा काही विषय नाही, हा तिहार प्रशासनाने केलेला दावा खोटा आहे. एम्सच्या डॉक्टारांनी असे म्हटलेले नाही. माझ्याकडे माझ्या शुगर लेव्हलचा डेटा मागितला. त्यानंतर सांगितले की, डाटा पाहिल्यावर आम्ही आमचे मत देऊ. मला अत्यंत दुःख होत आहे की, राजकीय दबावाखाली येऊन तुरुंग अधीक्षक खोट्या गोष्टी सांगत आहेत. मला आशा आहे की तुम्ही कायद्याचे पालन कराल, असे अरविंद केजरीवाल यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.