लष्कराच्या ट्रकने गुरुवारी एका सायकल चालविणाऱ्या तरुणाला चिरडले आणि मदत न करताच तेथून चालक ट्रकसह पसार झाला. यावर त्या तरुणाच्या वडिलांनी खूपच भावनिक प्रतिक्रिया दिली आहे. आर्मीच्या ट्रकने माझ्या मुलाला चिरडले, तशाच अवस्थेत ते तेथून निघून गेले. लष्कराला मी सॅल्यूट करतो, पण जखमी मुलाला जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेले असते तर तो वाचला असता, अशा शब्दांत त्यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
कुंवर अरोड़ा या २६ वर्षीय तरुणाला ट्रकने चिरडले होते. त्याच्यासोबत नेहमी आणखी दोघे असतात. परंतू शुक्रवारी पहाटे तो एकटाच गेला होता. ट्रकने चिरडल्यानंतर त्याच्या मदतीला कोणीच आले नाही. त्याच्या वडिलांना हे ऐकून खूप वाईट वाटले. त्यांना मुलगा गेल्यापेक्षा लष्कराचे जवान जे वागले त्याचे खूप वाईट वाटले. बेस हॉस्पिटल जवळच होते. तरीदेखील लष्कराचे जवान थांबले नाहीत, मुलाला त्यांनी हॉस्पिटलमध्ये नेण्याची तसदी देखील घेतली नाही, सैन्याच्या वाहनाकडून कमीतकमी एवढीतरी अपेक्षा होती, असे ते म्हणाले.
लष्कराने केले असते तर बरे झाले असते. ज्या व्यक्तीने पोलिसांना फोन करून माहिती दिली त्याचा मी आभारी आहे, असे ते म्हणाले.
ट्रक चालकाला अटकचाणक्यपुरी येथे गुरुवारी पहाटे सायकलस्वाराला उडवून पळून गेलेल्या लष्कराच्या ट्रकचालकाला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीचे नाव ओम प्रकाश (46) असे असून तो हरियाणातील जिंद जिल्ह्यातील बेलारखा गावचा रहिवासी आहे. तो लष्करात हवालदार आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, ट्रक कस्तुरबा गांधी मार्गावर असलेल्या संरक्षण मुख्यालयाच्या सुरक्षा दलाचा होता, जो अपघाताच्या वेळी ओम प्रकाश चालवत होता.