नवी दिल्ली: दिल्लीत सुरू असलेल्या बुलडोझर कारवाईवर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी यंताप व्यक्त केला आहे. आज केजरीवालांनी आपच्या सर्व आमदारांसोबत बैठक घेतली. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, "आम्ही अतिक्रमणाच्या विरोधात आहोत. बेकायदेशीरपणे घरे पाडली जात आहेत. येत्या काळात 63 लाख लोकांच्या घरांवर बुलडोझर चालवला जाईल. हा स्वतंत्र भारतातील सर्वात मोठा विध्वंस असेल,'' अशी टीका केजरीवालांनी केली आहे.
'63 लाख लोक रस्त्यावर येतील'भाजपवर हल्लाबोल करताना मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, "निवडणुकीपूर्वी भाजपने कच्च्या वसाहतीतील लोकांना मालकी हक्क दिला जाईल, असे सांगितले होते. जिथे झोपडपट्टी आहे तिथे घरे बांधली जातील, असेही भाजपने म्हटले होते. पण, निवडणुकीनंतर या सगळ्यांना ब्रेक लागला. आम्ही अतिक्रमणाच्या विरोधात आहोत, पण 63 लाख लोकांची घरे उद्ध्वस्त करुन त्यांचे जीवन उद्ध्वस्त करणे खपवून घेतले जाणार नाही."
'80% दिल्ली बेकायदेशीर'केजरीवाल पुढे म्हणाले की, "गेल्या कित्येक वर्षात दिल्लीचा विस्तार नियोजनबद्ध पद्धतीने झालेला नाही. शहरातील 80 टक्क्यांपेक्षा जास्त भाग बेकायदेशीर आहे, अतिक्रमण आहे. मग आता प्रश्न उद्भवतो की, भाजपच्या नेतृत्वाखालील महापालिका, शहराचा 80% भाग पाडणार का?,'' असा सवाल केजरीवालांनी उपस्थित केला.
'भाजपने बेकायदेशीरपणे इमारती बांधल्या'ते पुढे म्हणाले, "15 वर्षे महापालिकेत भाजपची सत्ता होती, त्या काळात त्यांनी स्वत: अनेक इमारती बेकायदेशीरपणे बांधल्या. आता 18 तारखेला त्यांचा कार्यकाळ पूर्ण होत असताना एवढा मोठा निर्णय घेण्याची नैतिक ताकद त्यांच्यात आहे का? तुम्ही निवडणुका घ्या. अतिक्रमण आणि बेकायदेशीरपणे बांधलेल्या इमारतींवर आम्ही तोडगा काढू, अशी ग्वाही आम्ही दिल्लीतील जनतेला देतो," असे मुख्यमंत्री म्हणाले.