"91 टक्के लोक म्हणतात भाजपा गुंडगिरी, हिंसाचार घडवून आणते"; मनीष सिसोदियांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2022 07:06 PM2022-05-04T19:06:32+5:302022-05-04T19:08:10+5:30
Manish Sisodia And BJP : सिसोदिया म्हणाले की, 21 एप्रिलपासून आम्ही सर्वेक्षणाचे काम सुरू केले, ज्यामध्ये 3 प्रश्न विचारण्यात आले. हे सर्वेक्षण करण्यासाठी दोन आठवडे लागले.
नवी दिल्ली - दिल्लीत भाजपा आणि आम आदमी पक्षाचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असतात. याच दरम्यान, एका सर्वेक्षणाचा हवाला देत दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांनी पुन्हा एकदा भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे. आम्ही लोकांचे सर्वेक्षण करून कोणता पक्ष गुंडागर्दी आणि दंगली करतो, असे विचारले होते, त्यात 91% लोकांनी भाजपा गुंडगिरी आणि हिंसाचार घडवून आणते असं सांगितलं.
सिसोदिया म्हणाले की, 21 एप्रिलपासून आम्ही सर्वेक्षणाचे काम सुरू केले, ज्यामध्ये 3 प्रश्न विचारण्यात आले. हे सर्वेक्षण करण्यासाठी दोन आठवडे लागले. आयव्हीआर कॉल, फील्ड वर्क आणि केटी सर्वेक्षण 3 प्रकारे केले गेले. यामध्ये 11 लाख 54 हजार 231 लोकांशी संवाद साधण्यात आला. हे सर्वेक्षण संपूर्ण दिल्लीत करण्यात आले आहे. सर्वेक्षणात 91 टक्के लोकांनी भाजपा गुंडगिरी आणि हिंसाचार घडवून आणत असल्याचं म्हटलं आहे. त्याच वेळी 8% काँग्रेस आणि 1% इतर असल्याचं सांगितलं.
कोणत्या पक्षात सर्वात जास्त निरक्षर लोक आहेत? उत्तरात 89% लोकांनी भाजपाचे नाव घेतले. 5% लोकांनी काँग्रेसला, 2% लोकांनी AAP आणि 4% लोकांनी इतरांना मतदान केले. ज्या पक्षात शिकलेले लोक आहेत यासाठी 73% लोकांनी AAP ला मतदान केले. 15 टक्के लोकांनी काँग्रेसला, 10 टक्के भाजपाला आणि 2 टक्के लोकांनी इतरांना मते दिली. भाजपावर निशाणा साधत मनीष सिसोदिया म्हणाले की, भाजपा जनतेमध्ये पूर्णपणे उघडे पडल्याचे दिसून येत आहे. ते फक्त गुंडगिरी करतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.