Ph.D, MA, B.Ed. ची डिग्री, तरीही 'ही' महिला विकतेय चहा; मोदींना पाहून सुचली कल्पना
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 01:07 PM2024-04-10T13:07:54+5:302024-04-10T13:08:46+5:30
एका महिलेने फक्त पीएचडीच नाही तर अनेक विषयांमध्ये डबल एएम आणि बीएडही केलं आहे. मात्र तरी देखील आजही ती दिल्लीच्या रस्त्याच्या कडेला चहा विकते आणि गरीब लोकांना मदत करते.
पीएचडीचा अभ्यास करणं खूप कठीण आहे. या कारणास्तव प्रत्येकजण पीएचडी करू शकत नाही. पण आज एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमधील एका महिलेने फक्त पीएचडीच नाही तर अनेक विषयांमध्ये डबल एएम आणि बीएडही केलं आहे. मात्र तरी देखील आजही ती दिल्लीच्या रस्त्याच्या कडेला चहा विकते आणि गरीब लोकांना मदत करते.
ग्वाल्हेरच्या ममता चतुर्वेदी या 52 वर्षांच्या आहेत. आदिवासी महिलांच्या समस्यांवर त्यांनी पीएचडी केल्याचं सांगितलं. याशिवाय त्यांनी एएम आणि बीएडची पदवीही घेतली आहेत. एवढ्या शिक्षणानंतरही चहा का विकता, असा प्रश्न त्यांना विचारला असता त्यांनी उत्तर दिलं. पतीचं चार वर्षांपूर्वी निधन झालं आहे आणि आता वयामुळे कुठेही नोकरी मिळत नाही. त्यामुळे चहा विकण्याचं काम सुरू केलं. मोदीजींना पाहून चहा विकण्याची कल्पना सुचल्याचं त्यांनी सांगितलं.
ममता चतुर्वेदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी अनेक एनजीओशी संलग्न होऊन वेगवेगळ्या प्रकल्पांवर काम केलं आहे. यासोबतच त्या गरीब लोकांना मदत करायच्या आणि ग्वाल्हेरमधील एका शाळेच्या प्रिन्सिपल देखील होत्या. 36 वर्षांपासून एका एनजीओमध्ये काम करत आहेत.
एनजीओच्या प्रकल्पांतर्गत दिल्लीला यावं लागलं, त्यामुळे दिल्लीतच राहण्याचा निर्णय घेतला. त्या एका एनजीओसाठी काम करतात आणि उरलेल्या वेळेत, दिल्लीच्या कॅनॉट प्लेसमध्ये लेडी हार्डिंज हॉस्पिटलच्या गेट नंबर 4 जवळ, पहाटे 4:00 वाजल्यापासून आपल्या चहाचा स्टॉल लावतात. न्यूज 18 हिंदीने ममता यांच्याशी संवाद साधला आहे.