Delhi Bus Fire : राजधानी दिल्लीत गुरुवारी भीषण अपघाताची घटना घडली. पूर्व दिल्लीतील जगतपुरी लाल बत्तीजवळ दिल्ली परिवहन मंडळाच्या बसला आग लागली. बसला आग लागल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली होती. जीव वाचवण्यासाठी प्रवाशी घाईघाईने बसमधून उतरले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दुसरीकडे अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग आटोक्यात आणली. मात्र, या आगीत बस पूर्णपणे जळून राख झाली आहे.
दिल्लीतील जगतपुरी भागात प्रवाशांनी भरलेल्या क्लस्टर बसला आग लागली. आग लागल्याचे कळताच प्रवाशांना घाईघाईने बसमधून बाहेर काढण्यात आले. बसला लागलेल्या आगीमुळे जगतपुरी, प्रीत विहार आणि पटपरगंज भागात अनेक किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे. या आगीनंतर बसमध्ये बसलेल्या लोकांसाठी तिथून बाईकवरुन जाणारी व्यक्ती देवदूत ठरली आहे. बसला आग लागल्याची माहिती बाईकस्वारानेच बसच्या चालकाला दिली होती. त्यामुळे अनेक प्रवाशांचा जीव वाचला.
बाईकवरुन जात आलेल्या एका व्यक्तीने बस चालकाला क्लस्टर बसला आग लागल्याचे सांगितले. त्यानंतर चालकाने तात्काळ बस थांबवून आत बसलेल्या सर्व प्रवाशांना बाहेर काढले. बसला आग लागल्यानंतरचा एक व्हिडिओही समोर आला आहे. व्हिडिओमध्ये बस आगीच्या गोळ्यासारखी जळताना दिसत आहे. आगीमुळे आजूबाजूच्या परिसरात धुराचे लोट पसरले होते. आगीच्या घटनेमुळे प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली होती. या बसमध्ये एकूण ५० प्रवासी होते आणि सर्वजण सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, बसला भररस्त्यात आग लागल्यानंतर जगतपुरी, प्रीत विहार आणि पटपरगंज भागात अनेक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र आगीचे स्वरुप इतकं भीषण होतं की बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही बस सीएनजी एसी बस होकी. त्यामुळे परिसराची नाकाबंदी करण्यात आली असून सुमारे ५० प्रवाशांची सुटका करण्यात आली आहे. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या आणि आग विझवली.