- उमेश जाधव/ सुमेध बनसोडनवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरोधी आंदोलनास हिंसक वळण लागल्याने दिल्लीसह देश रविवारी हादरला. दक्षिण दिल्लीत न्यू फ्रेंडस कॉलनीत आंदोलकांनी तीन बसेस जाळल्या. विझवताना अग्निशमन दलाचे दोन जवान जखमी झाले. हिंसाचारामुळे जनजीवन विस्कळीत झाले. दिल्लीकरांमध्ये घबराट पसरली. शहरात जागोजागी निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या 'कॅब'विरोधी आंदोलनाच्या केंद्रस्थानी जामिया मीलिया विद्यापीठ होते. मात्र हिंसाचाराशी विद्यार्थ्यांचा संबंध नाही, असे स्पष्टीकरण विद्यापीठ प्रशासनाने दिले. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सर्वांना शांततेचे आवाहन केले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून ५ मेट्रो स्थानक बंद करण्यात आले होते. जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात सुरू असलेल्या आंदोलनाला रविवारी हिंसक वळण मिळाले. दक्षिण दिल्लीतील न्यू फ्रेंड्स कॉलनीत पोलीस आणि आंदोलकांमध्ये वाद झाला. आंदोलकांनी डीटीसीच्या बसेस पेटवून दिल्या. शाहीनबाग आणि मथुरा रोड या परिसरात अनेकांनी ठिकठिकाणी आंदोलन केले. यावेळी पोलिसांवर दगडफेकही करण्यात आली.
घटनाक्रमकॅब विधेयक मंजूर झाल्यावर दिल्लीत तीव्र प्रतिक्रिया उसळली. जामियातील आंदोलनाचा सहावा दिवस होता. शेकडो विद्यार्थी, तरूण, विविध राजकीय पक्षांचे नेते, संघटनांचे प्रतिनिधी रविवारी जामियाजवळ जमले होते. सायंकाळी चार वाजता हजारोंच्या संख्येने आंदोलक जमले. त्यांच्यासमोर एका राजकीय नेत्याचे भाषण झाले. जमावाचा त्यामुळेच भडका उडाला व बसेसची जाळपोळ सुरू झाली. शांततापूर्ण आंदोलन सुरू असताना पोलिसांनी लाठीमार केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. एनएसयूआयचे राष्ट्रीय सचिव सैमन फारुकी लोकमतशी बोलताना म्हणाले की, आंदोलक मथुरा रोडवर शांततापूर्ण आंदोलन करत होते. आंदोलक-पोलिसांमध्ये वाद झाला. तणावात त्यामुळे वाढ झाली. पोलिसांनी लाठीमार सुरू केला. संतप्त जमावाने त्यामुळे बसेस जाळल्या. आंदोलन शांततापूर्ण मार्गानेच व्हावे. कुणीही हिंसाचारात सामील होवू नये. हिंसाचार स्वीकार्ह नाहीच. लोकांनी शांतता राखावी.-अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री विद्यार्थी म्हणतात, ‘आमचा सहभाग नाही’‘कॅब’च्याविरोधात झालेल्या जाळपोळीच्या घटनेशी आपला संबंध नसल्याचे जामियातील विद्यार्थी संघटनांनी म्हटले आहे. ‘आमचे आंदोलन शांततापूर्ण आहे आणि पुढेही तसेच सुरू राहील. आज ज्या पद्धतीने आंदोलनाला हिंसक वळण देण्यात आले आहे, त्याचा आम्ही निषेध करतो. आमच्यावर पोलिसांनी लाठीचार्ज केला, आमच्यातील काही महिला आंदोलक त्यात जखमीही झाल्या. तरीही आम्ही शांततापूर्ण वातावरणात निषेध नोंदवला. काही विशिष्ट्य लोक जाळपोळ करून या आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत,’ असे स्टुडंट कम्युनिटी आॅफ जामिया यांनी स्पष्ट केले आहे. ‘हे विद्यापीठाचे आंदोलन नाही’‘कॅब’ विरोधातील हिंसक आंदोलनाशी विद्यापीठाचा संबंध नसल्याचे जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ‘हे आंदोलन विद्यापीठ परिसरात झालेले नाही. त्यात मोठ्या प्रमाणात बाहेरच्या लोकांचा सहभाग आहे. आम्ही विद्यार्थ्यांशी संवाद साधला असून ते शांततापूर्ण आंदोलन करीत आहेत,’ असे विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी अहमद अझीम यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. आरोप-प्रत्यारोप सत्ताधारी आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्लाह खान या प्रदर्शनाचे नेतृत्व करीत असल्याचा आरोप आपचे निलंबित आमदार कपिल मिश्रा यांनी केल्याने एकच खळबळ उडाली. आंदोलकांसमवेत अमानतुल्लाह खान होते, त्यांनीच लोकांना चिथावणी दिल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र अमानतुल्लाह खान यांनी आरोपांचे खंडन केले. आपण त्या ठिकाणी उपस्थित नव्हतो, असे त्यांनी म्हटले आहे.