नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल जवळपास स्पष्ट झाला आहे. सत्ताधारी आम आदमी पार्टीला बहुमत मिळताना दिसत आहे. तर भाजपानं गेल्या निवडणुकीच्या तुलनेत कामगिरीत सुधारणा केली आहे. मात्र काँग्रेसची परिस्थिती जैसे थेच आहे. गेल्या निवडणुकीत भोपळाही फोडू न शकलेली सध्या एकाही विधानसभा मतदारसंघात आघाडीवर नाही. मात्र काँग्रेसच्या कामगिरीचा फायदा अनेक ठिकाणी अप्रत्यक्षपणे भाजपाला झाला आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा दिल्लीत भाजपानं चांगली लढत दिली आहे. विशेष म्हणजे काँग्रेसनं चांगले उमेदवार दिलेल्या मतदारसंघांत भाजपानं आघाडी घेतली आहे. त्यामुळे काँग्रेसनं चांगले उमेदवार दिल्याचा अप्रत्यक्ष फायदा भाजपाला झाल्याचं म्हणता येईल. दिल्लीतल्या काही मतदारसंघांमध्ये तिहेरी लढत होत आहे. या ठिकाणी भाजपानं आपला मागे टाकलं आहे. उत्तर दिल्लीतल्या मॉडेल टाऊन, करवल नगर, पूर्व दिल्लीतल्या द्वारका, कृष्णा नगर, पश्चिम दिल्लीतल्या मोती नगरमध्ये भाजपा उमेदवार आघाडीवर आहेत. याशिवाय मुस्लिम बहुसंख्य असलेल्या बल्लीमारन आणि ओखला विधानसभा मतदारसंघातही भाजपानं चांगली कामगिरी केली आहे. याठिकाणी काँग्रेसनं आपची मतं घेतल्याची चर्चा आहे. बल्लीरामनमध्ये आपचे इमरान हुसेन पुढे आहेत. मात्र त्यांच्याकडे माफक आघाडी आहे. तर ओखलामध्ये भाजपाचे उमेदवार ब्रह्मसिंग आघाडीवर आहेत. या मतदारसंघात अमनतुल्ला खान मागे आहेत.
Delhi Election 2020 Results : महत्त्वाच्या मतदारसंघात भाजपाला काँग्रेसकडून अप्रत्यक्ष 'हात'; आपवर आघात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 11:38 AM