नवी दिल्ली : कोट्यधीश उमेदवारांना निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याची जणू काही चढाओढ भाजप व आम आदमी पक्षात आहे. विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात सर्वाधिक श्रीमंत पहिल्या चार उमेदवारांमध्ये 'आप'चे उमेदवार आहेत. मुंडकाचे आप उमेदवार धर्मपाल लाकडा यांची संपत्ती २९० कोटी एवढी आहे. त्यांच्या आसपासदेखील 'टॉप टेन' श्रीमंत उमेदवार नाहीत.
आपच्या चार उमेदवारांनी प्रारंभीच यादी व्यापली आहे. त्या खालोखाल पाचव्या क्रमांकावर काँग्रेसच्या प्रियंका सिंह यांची संपत्ती ७० कोटी ३० लाख इतकी आहे. सहा ते १० दरम्यान भाजप उमेदवारांचा बोलबाला आहे. भाजपचे सर्वात 'गरीब' उमेदवार कोंडलीचे राज कुमार ढिल्लन आहे. त्यांच्याकडे केवळ ५५ हजार ९०० रूपयांची संपत्ती आहे. ढिल्लो यांचे किराणा दुकान आहे. त्यांच्याकडे अचल संपत्ती नाही. आपच्या सर्वात गरीब उमेदवार राखी बिडलान आहेत. त्यांची संपत्ती ७६ हजार ४२१ रूपये आहे. एकूण उमेदवारांपैकी पाच जणांची संपत्ती १ लाखांपेक्षा कमी आहे. काँगेसच्या रॉकी तुसिड यांच्याकडे ५५ हजार ५४७ रूपयांची संपत्ती आहे. राजेंद्र नगरमधून काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली आहे.'टॉप टेन'मधील उमेदवार- आपच्या प्रमिला टोकस (आरके पुरम) ८० कोटी ८० लाख, रामसिंह नेताजी (बदपूर) ८० कोटी, राजकुमार आनंद (पटेल नगर) - ७६ कोटी यांचा यादीत समावेश आहे. भाजपचे ब्रह्म सिंह तंवर (छतरपूर) ६६ कोटी ३० लाख, अनिल गोयल (कृष्णा नगर) ६४ कोटी १० लाख, सत प्रकाश राणा (बिजवासन) ५७ कोटी ४० लाख, धनवती चंदेला (राजौरी गार्डन) ५६ कोटी ९० लाख व नरेश बाल्यान (उत्तम नगर) ५६ कोटी ३० लाख- या उमेदवारांचा 'टॉप टेन'मध्ये समावेश आहे.