नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने वेगवेगळ्या राज्यांतील प्रमुख नेत्यांना त्यांच्या राज्यातील रहिवासी राहत असलेल्या भागात सभा घेण्याची जवाबदारी दिली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील हे सुद्धा दिल्लीतील विविध विधानसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ सभा आणि बैठका घेताना पाहायाला मिळत आहे. तर अशाच एका बैठकीत त्यांनी आपचे प्रमुख आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला.
गेल्या आठवड्याभरापासून चंद्रकांत पाटील हे दिल्लीत ठाण मांडून आहे. दिल्लीच्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या सोबत ते सुद्धा प्रचाराच्या रिंगणात उतरले आहे. तर भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ ते विविध भागात जाऊन 'डोर टू डोर' मतदारांची भेट घेत आहे. तसेच भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ ते विविध मतदारसंघात बैठका सुद्धा घेत आहे. अशाच एका बैठकीत बोलताना त्यांनी केजरीवाल यांच्यावर जोरदार टीका केली.
शकूरबस्ती विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉ. एस. सी. वत्स यांच्या प्रचारार्थ सैनिक विहार येथील बैठकीत बोलताना ते म्हणाले की, मुख्यमंत्री केजरीवाल यांनी दिल्लीकरांना मोठ्याप्रमाणावर आश्वासने दिले होते. प्रत्यक्षात मात्र त्यांनी काहीच केलं नाही. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आश्वासने कमी दिली, मात्र कामे त्यापेक्षा जास्त करून दाखवली, असे पाटील यावेळी म्हणाले.