नवी दिल्ली - दिल्ली विधानसभेत पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने बाजी मारली आहे. आपला 50 पेक्षा अधिक जागांवर आघाडी मिळाली असून दिल्लीत फिर एक बार केजरीवाल सरकार, स्थापन होणार असल्याचे स्पष्ट झालंय. त्यामुळे, अनेक राजकीय नेते आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. आता, सिंघमफेम अभिनेता आणि दक्षिण भारतातील नेता प्रकाश राजनेही सिंघमस्टाईल प्रतिक्रिया दिली आहे. शॉक लगा..? असे म्हणत भाजपावर शिरसंधान साधलं आहे.
प्रकाश राज यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन दिल्लीतील निकालावर भाष्य केलंय. गोळ्या मारणाऱ्यांना झाडूने मारलं, शॉक लगा? असे ट्विट राज यांनी केलंय. राज यांनी सिंघम चित्रपटातील डायलॉग वापरुन भाजपाला लक्ष्य केलं. तसेच, सीएए आणि एनआरसी विरोधातील आंदोलकांवर दिल्ली पोलिसांकडून झालेल्या गोळीबाराचाही चिमटा काढला. प्रकाश राज नेहमीच डाव्या विचारसरणीच्या बाजूने आपली भूमिका मांडतात. दिल्ली निकालानंतरही त्यांनी भाजपाला लक्ष्य केलं आहे.
दरम्यान, दिल्लीतील जनतेनं आपल्या मुलाला निवडून दिलं आहे. दिल्लीकरांची सेवा केल्यामुळेच हा विजय मिळाला आहे. भाजपाने, सत्ता, पैसा आणि दिग्गज मंत्र्यांची फौज दिल्ली विधानसभेच्या निवडणूक प्रचारात उतरवली होती. मात्र, दिल्लीकरांनी 'आप'ला माणूस निवडून दिला. दिल्ली विधानसभेत आपला बहुमत मिळाल्याचं आता स्पष्ट झालंय. त्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना संबोधित करताना सिंह यांनी हा विजय जनतेचा असल्याचं म्हटलं. तसेच, दिल्लीच्या लोकांनी दाखवून दिलंय की, त्यांचा मुलगा देशद्रोही नसून कट्टर देशभक्त आहे, असेही ते म्हणाले होते.