नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकीत शिरोमणी अकाली दलानंभाजपाला पाठिंबा जाहीर केला आहे. शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर बादल यांनी आज पत्रकार परिषद घेऊन याबद्दलची घोषणा केली. भाजपाला दिलेला पाठिंबा राजकीय आघाडीचा भाग नसून त्याचं स्वरुप भावनिक असल्याचं बादल यांनी म्हटलं. पंजाब आणि शीखांचा हितासाठी भाजपाला पाठिंबा दिल्याचं त्यांनी सांगितलं. पंजाब आणि दिल्लीत अकाली दल भाजपा नेतृत्त्वाखाली काम करू, असं सुखबीर बादल यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं. या पत्रकार परिषदेला भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा उपस्थित होते. यावेळी त्यांनी शिरोमणी अकाली दलाचे आभार मानले. याआधी शिरोमणी अकाली दलानं दिल्ली विधानसभेची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात भूमिका घेत अकाली दलाकडून हा निर्णय जाहीर करण्यात आला होता. शिरोमणी अकाली दल आणि भाजपाची युती अतिशय जुनी असल्याचं म्हणत नड्डा यांनी पाठिंबा देणाऱ्या बादल यांचे आभार व्यक्त केले. यावेळी मनजिंदर सिंह सिरसा यांनी अकाली दलाची भूमिका स्पष्ट केली. आम्ही जागावाटपावरुन नव्हे, तर सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन विधानसभा निवडणूक न लढवण्याची भूमिका घेतली आहे. त्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. दिल्लीत आम्ही भाजपाला पाठिंबा देत आहोत, असं सिरसा यांनी पत्रकारांना सांगितलं.
अखेर भाजपाच्या मदतीला आला जुना मित्र; निवडणुकीपूर्वी पाठिंबा जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2020 7:46 PM