AAP Unbreakable Delhi Police: दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा पारा चढू लागला आहे. शनिवारी आम आदमी पक्ष अनब्रेकेबल ही डॉक्युमेंटरी सर्व चित्रपटगृहांत दाखवणार होता. पण, त्यावर पोलिसांनी बंदी घातल्याचा आरोप करण्यात आला आहे. भाजपच्या आदेशावरून दिल्ली पोलिसांनी बंदी घातली असून, डॉक्युमेंटरी दाखवू नका, अशी धमकी चित्रपटगृह मालकांना देण्यात आल्याचा दावा आपकडून करण्यात आला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
गेल्या काही वर्षात आपचे समन्वयक आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, संजय सिंह, सत्येंद्र जैन यांच्यासह अनेक नेत्यांना अटक झाली. त्यांना बराच काळ तुरुंगात राहावं लागलं. याच विषयावर अनब्रेकेबल अशी डॉक्युमेंटरी आपने तयार केली आहे. दिल्लीतील सर्वच चित्रपटगृहात ही डॉक्युमेंटरी शनिवारी (१७ जानेवारी) सकाळी ११.३० वाजता दाखवण्यात येणार होती.
पोलिसांनी चित्रपटगृह मालकांना धमक्या दिल्या -आप
एएनआय वृत्तसंस्थेने आपमधील सूत्रांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे. आम आदमी पक्षाने दावा केला आहे की, भाजपच्या आदेशावरून दिल्ली पोलिसांनी अनब्रेकेबल डॉक्युमेंटरीच्या प्रदर्शनावर बंदी घातली आहे. आप नेत्यांना तुरुंगात पाठवण्यात आल्याच्या विषयावर ही डॉक्युमेंटरी असून, ती ११.३० वाजता दाखवण्यात येणार होती. दिल्लीतील सर्व चित्रपटगृह मालकांना डॉक्युमेंटरी दाखवू नका, अशी धमकी देण्यात आली, असा आरोप करण्यात आला आहे.
प्रदर्शन थांबवून भाजपला काय साध्य करायचं आहे. आम्ही डॉक्युमेंटरी दाखवणारच, भाजप आवाज दाबू शकत नाही, असे आपने म्हटले आहे.
दिल्ली पोलिसांनी केला खुलासा
आपच्या डॉक्युमेंटरी प्रदर्शनावर बंदी घातल्याच्या प्रकरणावर दिल्ली पोलिसांनी भूमिका स्पष्ट केली आहे.
"आपच्या अनब्रेकेबल डॉक्युमेंटरीच्या प्रदर्शनासंदर्भात कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नव्हती आणि हे नियमांचे उल्लंघन आहे. आम्ही सर्व पक्षांना आवाहन करतो की, निवडणूक आचार संहिता आणि कायद्याचे पालन करावं. निवडणूक जाहीर झालेली आहे, त्यामुळे राजकीय पक्षांना डीईओ कार्यालयात अर्ज करून परवानगी घ्यावी. ही साधारण प्रक्रिया आहे, अशी भूमिका पोलिसांनी मांडली.