'दिल्लीत अरविंद केजरीवाल जिंकणार, काँग्रेस...', पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 22:16 IST2025-01-08T22:15:24+5:302025-01-08T22:16:43+5:30

दिल्ली विधानसभा निवडणुकीबाबत पृथ्वीराच चव्हाण यांनी मोठा दावा केला आहे.

Delhi Election 2025 :'Arvind Kejriwal will win in Delhi', Prithviraj Chavan's big claim | 'दिल्लीत अरविंद केजरीवाल जिंकणार, काँग्रेस...', पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा दावा

'दिल्लीत अरविंद केजरीवाल जिंकणार, काँग्रेस...', पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा दावा

Delhi Election 2025 : दिल्लीतील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. दिल्लीत 5 फेब्रुवारीला मतदान होणार असून 8 फेब्रुवारीला निकाल लागणार आहेत. दरम्यान, दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि दिग्गज काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठे वक्तव्य केले आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांचा विजय होईल, असे वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे. 

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या निवडणुकीचा प्रचार अधिक तीव्र केला आहे. आम आदमी पार्टी, भाजप आणि काँग्रेसमध्ये प्रमुख लढत आहे. मागील निवडणुकीत 70 पैकी आपला 62 आणि भाजपला 8 जागा मिळाल्या होत्या. तर, काँग्रेसला मागील दोन्ही निवडणुकीत भोपळा मिळाला आहे. आता सर्वच पक्ष आपापल्या विजयाचा दावा करत आहेत. अशातच, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठे वक्तव्य केले आहे. 

आयएएनएस या वृत्तसंस्थेशी बोलताना काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, "दिल्लीची निवडणूक खूप महत्त्वाची आहे. मला वाटते अरविंद केजरीवाल जिंकतील. काँग्रेसही रिंगणात आहे. आप आणि काँग्रेस, यांच्यात युती व्हायला हवी होती, पण तसे झाले नाही. इथे (महाराष्ट्र) बसून दिल्लीत काय चालले आहे हे सांगणे कठीण होईल," अशी प्रतिक्रिया पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे.

मागील दोन निवडणुकीत आपचा मोठा विजय 
अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टी (आप) दिल्लीत सलग तिसऱ्यांदा विजय मिळवण्याचा प्रयत्न करत आहे, तर भाजपही सत्ता मिळवण्याच्या प्रयत्नात असेल. काँग्रेसही यंदा आपली प्रतिष्ठा टिकवण्याचा प्रयत्न करेल. दरम्यान, आम आदमी पक्षाने 2015 आणि 2020 च्या निवडणुकीत अनुक्रमे 67 आणि 62 जागांसह मोठा विजय मिळवला होता. तर, भाजपला 2015 मध्ये 3 आणि 2020 मध्ये 8 जागांवर समाधान मानावे लागले होते. काँग्रेसला दोन्ही निवडणुकांमध्ये खातेही उघडता आले नव्हते. 

काँग्रेसने 2024 ची लोकसभा निवडणूक दिल्लीत आम आदमी पार्टीसोबत आघाडी करून लढवली होती. मात्र, आता आम आदमी पार्टीने विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पक्षाने आपले सर्व 70 जागांसाठी उमेदवारही जाहीर केले असून, पक्षाचा प्रचार सुरू झाला आहे. 

Web Title: Delhi Election 2025 :'Arvind Kejriwal will win in Delhi', Prithviraj Chavan's big claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.