काँग्रेसची 'प्यारी दीदी योजना', दिल्लीतील महिलांना दरमहा मिळणार २५०० रुपये
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 13:30 IST2025-01-06T13:30:23+5:302025-01-06T13:30:47+5:30
Delhi Election 2025 : महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी काँग्रेसने सत्तेत आल्यास प्रत्येक महिलेला २५०० रुपये देण्याची घोषणा केली आहे.

काँग्रेसची 'प्यारी दीदी योजना', दिल्लीतील महिलांना दरमहा मिळणार २५०० रुपये
Delhi Election 2025 : नवी दिल्ली : सध्या दिल्लीत विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी आपसह सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने मोठी घोषणा केली आहे. महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी काँग्रेसने सत्तेत आल्यास प्रत्येक महिलेला २५०० रुपये देण्याची घोषणा केली आहे.
काँग्रेसने सोमवारी प्यारी दीदी योजनेची घोषणा केली. या योजनेची घोषणा करताना, काँग्रेस नेते आणि कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार म्हणाले की, सत्तेत आल्यानंतर पहिल्या कॅबिनेट बैठकीत या योजनेला मंजुरी दिली जाईल. तर, दिल्ली काँग्रेसचे प्रभारी काझी निजामुद्दीन म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्ष सामाजिक कल्याण आणि महिला सबलीकरणाशी संबंधित पहिली गॅरंटी लाँच करत आहे.
समाज कल्याण आणि महिला सक्षमीकरणासाठी काँग्रेस नेहमीच तत्पर आहे.कर्नाटकातही सरकार स्थापन होताच काँग्रेसने पहिल्या मंत्रिमंडळात सामाजिक कल्याणाची योजना ठरवली आणि अंमलात आणली. त्यामुळे महिला सक्षमीकरणासाठी दिल्लीत काँग्रेस आवश्यक आहे, असेही काझी निजामुद्दीन यांनी सांगितले.
दरम्यान, काँग्रेसची ही घोषणा म्हणजे दिल्ली निवडणुकीत महिला मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले जात आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मतदार यादीनुसार दिल्लीत ७१ लाख महिला मतदार आहेत. याआधी आपने पुन्हा सरकार स्थापन झाल्यास महिलांना दरमहा २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. आपकडूनही महिलांची नोंदणी केली जात आहे. अशा स्थितीत आता भाजपच्या संकल्प पत्राकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.