दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आम आदमी पक्षाचा माजी नगरसेवक आणि दिल्ली दंगलीतील आरोपी ताहिर हुसेन याला सर्वोच्च न्यायालयाने कस्टडी पॅरोल दिली आहे. त्याला दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी ही पॅरोल देण्यात आली आहे. ताहिर हुसेन हा एमआयएम पक्षाकडून मुस्तफाबाद विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे.
सर्वोच्च न्यायालयाने तुरुंगाच्या नियमांच्या वेळेअनुरूप ताहिर हुसेन याला दिवसातील १२ तासांसाठी कस्टडी पॅरोल दिली आहे. ही कस्टडी पॅरोल २९ जानेवारी ते ३ फेब्रुवारी या काळासाठी देण्यात आली आहे. या काळात त्याला घरी जाण्याची परवानगी नसेल.
ताहिर हुसेन याला त्याच्या कस्टडी पॅरोलचा सर्व खर्च स्वत: करावा लागणार आहे. त्यासाठी त्यााल दोन दिवसांपर्यंत सुमारे २ लाख रुपये जमा करावे लागतील. या रकमेचा वापर त्याच्यासोबत तैनात करण्यात आलेले कर्मचारी आणि जेल व्हॉनवर होणार आहे.
या काळात त्याला पक्षाच्या कार्यालयात जाण्याची तसेच मतदारसंघामध्ये सभा घेण्याची परवानगी असेल. मात्र ताला घरी जाता येणार नाही. तसेच त्याला तुरुंगात प्रलंबित असलेल्या खटल्यांबाबत कुठल्याही प्रकारचं वक्तव्य करता येणार नाही.
असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम पक्षाने दिल्ली दंगलीमधील आरोपी असलेल्या ताहिर हुसेन याला दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मुस्तफाबाद मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. २०२० साली फेब्रुवारी महिन्यात दिल्लीमध्ये झालेल्या दंगली प्रकरणी ताहिर हुसेन हा एक आरोपी आहे.