लोकसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का बसल्यानंतर भाजपाने हरयाणा, महाराष्ट्रात दणदणीत विजय मिळवला होता. त्यानंतर आता आम आदमी पक्षाचा दिल्लीतील बालेकिल्ला सर करत भाजपाने विरोधी पक्षांच्या आघाडीला मोठा धक्का दिला आहे. दिल्लीत आलेल्या भाजपाच्या लाटेत अरविंद केजरीवाल यांच्यासह आम आदमी पक्षाचे अनेक दिग्गज नेते पराभूत झाले. दरम्यान, भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर आता दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी कोण विराजमान होणार याची उत्सुकता दिल्लीकरांना लागली आहे. मात्र नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी काही काळ वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे. मिळत असलेल्या माहितीनुसार १३ फेब्रुवारीनंतर दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होऊ शकतो. शपथविधी लांबण्यामागे नेमकं कारण काय आहे हे आपण आता जाणून घेऊयात.
दिल्लीमध्ये तब्बल २७ वर्षांनंतर भाजपाची सत्ता आली आहे. येथील विधानसभेच्या ७० जागांपैकी ४८ जागांवर भाजपाचा विजय झाला आहे. तर आम आदमी पक्षाला २२ जागांवर समाधान मानावे लागले आहे. दिल्लीत दीर्घकाळ सत्तेवर असलेल्या काँग्रेसला एकही जागा जिंकता आलेली नाही. या निवडणुकीत आम आदमी पक्ष अरविंद केजरीवाल यांचा चेहरा समोर ठेवून लढली होती. तर भाजपाने मुख्यमंत्रिपदासाठी कुठल्याही चेहऱ्याचं नाव समोर न ठेवत निवडणूक लढवली होती. त्यामुळे भाजपाकडून मुख्यमंत्रिपदाची माळ कुठल्या नेत्याच्या गळ्यात पडणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. त्यासाठी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी बैठका घेण्यास सुरुवात केली आहे.
भाजपाकडून मुख्यमंत्रिपदासाठी अनेक नावं समोर येत आहेत. त्यामध्ये अरविंद केजरीवाल यांचा पराभव करणारे परवेश वर्मा, दिल्ली विधानसभेत विरोधी पक्षनेते राहिलेले विजेंद्र गुप्ता, सतीश उपाध्याय, आशिष सूद आमि जितेंद्र महाजन यांचीही नावं चर्चेत आहेत. दरम्यान, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी अमेरिकेचा दौरा करणार आहेत. यादरम्यान, ते अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे मोदी मायदेशात परतल्यानंतरच दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे.