शनिवारी लागलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये सत्ताधारी आम आदमी पक्षाला पराभव पत्करावा लागला. तर भाजपाने ७० पैकी ४८ जिंकून स्पष्ट बहुमतासह तब्बल २७ वर्षांनंतर दिल्लीची सत्ता मिळवली आहे. दरम्यान, दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने मतविभाजन घडवल्याने अनेक जागांवर आम आदमी पक्षाचा पराभव झाल्याचा दावा आकडेवारीच्या माध्यमातून करण्यात येत आहे. दिल्लीतील ७० पैकी १३ जागांवर आपच्या उमेदवारांचा जेवढ्या मतांनी पराभव झाला, त्यापेक्षा अधिक मतं काँग्रेसच्या उमेदवारांनी घेतली आहेत. त्यावरून आप आणि काँग्रेस एकत्र लढले असते तर भाजपाचा पराभव झाला असता असा दावा काही जणांकडून केला जात आहे. मात्र हे समीकरण वरकरणी जितकं साधं सोपं दिसतं तेवढं नाही आहे, हे सविस्तर आकडेवारीवरून दिसून येत आहे.
दिल्लीमध्ये आप आणि काँग्रेस यांच्यात आघाडी झाली असती तरी आपच्या कार्यकर्त्यांनी सर्वच्या सर्व मतं काँग्रेसला दिली असती किंवा काँग्रेसची सर्वच्या सर्व मतं आपला मिळाली असती, असं छातीठोकपणे सांगता येत नाही. २०२४ ची लोकसभा निवडणूक आणि २०२५ मधील दिल्ली विधानसभा निवडणूक याच्या आकडेवारीच्या विश्लेषणामधून काही महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. २०२२ मध्ये झालेल्या दिल्ली एमसीडी निवडणुकीत दिल्लीतील विधानसभेच्या ७० पैकी ६८ जागांवर आम आदमी पक्षाला ४२.०५ टक्के मतं मिळाली होती. विधानसभेच्या उर्वरित २ जागा ह्या नवी दिल्ली महापालिकेच्या अखत्यारीत येतात, तिथे एमसीडी निवडणूक होत नाही. या आकडेवारीवरून तेव्हापासून आतापर्यंत आपच्या आकडेवारीत फार फरक झाला नसल्याचे दिसून येत आहे.
त्यानंतर २०२४ मध्ये दिल्लीमधील लोकसभा निवडणुकीवेळी दिल्लीतील ७ जागांपैकी ४ जागांवर आप तर ३ जागांवर काँग्रेसने निवडणूक लढवली होती. त्यावेळीही दोन्ही पक्षांना मिळून ४२.५३ टक्के मतं मिळाली होती. मात्र या विधानसभेतील दोन्ही पक्षांची एकत्रित आकडेवारी पाहिल्यास ती ४९.९ टक्के एवढी होते. दरम्यान, दिल्लीतील ७० पैकी ४२ जागा अशा आहेत. जिथे आम आदमी पक्षाला मिळालेली मतं ही २०२४ च्या लोकसभा निवडणुकी आप आणि काँग्रेसच्या आघाडीला मिळालेल्या मतांपेक्षा अधिक आहेत. या आकडेवारीवरून स्पष्ट दिसते की, आपच्या कार्यकर्त्यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी जिथे कांग्रेसचे उमेदवार आहेत अशा ठिकाणी काँग्रेसला मतदान केलं नाही.
मात्र आता काँग्रेससोबत आघाडी नसताना या कार्यकर्त्यांनी आम आदमी पक्षाला सक्रियपणे मतजान केलं आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत आप आणि काँग्रेसची मतं एकत्र जोडून दिल्ली विधानसभा निवडणुकीतील जय पराजयाबाबत अंदाज बांधला जाऊ शकत नाही. दिल्लीमध्ये काँग्रेस आणि आपची आघाडी असतील तर आपच्या कार्यकर्त्यांना आपलाच मतदान केलं असतं असं नाही. तर त्यापैकी काही मतदार हा भाजपाच्या दिशेनेही वळला असता.