दिल्लीत काँग्रेस हरली, पण आपच्या या बड्या नेत्यांच्या पराभवात महत्त्वाची भूमिका बजावली, अशी समीकरणं बदलली   

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 16:48 IST2025-02-08T16:47:47+5:302025-02-08T16:48:55+5:30

Delhi Election 2025 Results Live Update: दिल्लीमध्ये काँग्रेसने स्वत:चा पराभव होत असताना आम आदमी पक्षाच्या अनेक नेत्यांचा पराभव घडवण्यात महत्त्वाची आणि निर्णायक भूमिका बजावली. त्यामुळे अरविंद केजरीवाल, मनिष सिसोदिया यांच्यासह आपचे अनेक नेते निसटत्या फरकाने पराभूत झाले.

Delhi Election 2025 Results: Congress lost in Delhi, but the equations changed as these big leaders of AAP played an important role in its defeat | दिल्लीत काँग्रेस हरली, पण आपच्या या बड्या नेत्यांच्या पराभवात महत्त्वाची भूमिका बजावली, अशी समीकरणं बदलली   

दिल्लीत काँग्रेस हरली, पण आपच्या या बड्या नेत्यांच्या पराभवात महत्त्वाची भूमिका बजावली, अशी समीकरणं बदलली   

आज जाहीर झालेल्या दिल्ली विधानसभेच्या निकालांमध्ये भाजपाने ४८ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. तर आम आदमी पक्षाला पराभवाचा धक्का बसला आहे. दरम्यान, एकेकाळी दिल्लीत सत्ता असणाऱ्या काँग्रेसने येथील आपल्या खराब कामगिरीमध्ये सातत्य ठेवलं असून, सलग तिसऱ्यांदा पक्षाला भोपळाही फोडता आलेला नाही. मात्र उल्लेखनीय बाब म्हणजे काँग्रेसने स्वत:चा पराभव होत असताना आम आदमी पक्षाच्या अनेक नेत्यांचा पराभव घडवण्यात महत्त्वाची आणि निर्णायक भूमिका बजावली. त्यामुळे अरविंद केजरीवाल, मनिष सिसोदिया यांच्यासह आपचे अनेक नेते निसटत्या फरकाने पराभूत झाले.

लोकसभा निवडणुकीवेळी दिल्लीमध्ये आप आणि काँग्रेस हे इंडिया आघाडीच्या माध्यमातून एकत्र निवडणूक लढले होते. मात्र विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांची आघाडी झाली नव्हती. त्यामुळे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढल्याने दिल्लीतील काही जागांवर मतविभाजन झालं. तसेच या मतविभागणीचा मोठा फायदा भाजपाला झाला. दिल्लीतील अनेक मतदारसंघात काँग्रेसला मिळालेली मतं ही आपच्या पराभूत उमेदवारांच्या पराभवाच्या अंतरापेक्षा अधिक होती. त्यामुळे काही मतदारसंघा हे दोन्ही पक्ष एकत्र असते तर दिल्लीतील गणित बदललं असतं असे दावे केले जात आहेत.

दरम्यान, दिल्लीमध्ये काँग्रेसने उमेदवार दिल्याने मतविभाजन होऊन आम आदमी पक्षाच्या ज्या बड्या नेत्यांचा पराभव झाला त्यामधील पहिलं नाव आहे ते म्हणजे आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंक केजरीवाल यांच. अरविंद केजरीवाल हे नवी दिल्ली मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. येथे केजरीवाल यांच्यासमोर भाजपाचे प्रवेश वर्मा आणि काँग्रेसचे संदीप दीक्षित यांचं आव्हान होतं. या लढतीत भाजपाच्या प्रवेश वर्मा यांनी आपच्या अरविंद केजरीवाल यांचा ४ हजार ८९ मतांनी पराभव केला. तर येथे काँग्रेसचे उमेदवार असलेल्या संदीप दीक्षित यांना ४ हजार ५६८ मतं मिळाली. केजरीवाल यांच्या पराभवात संदीप दीक्षित यांना मिळालेली मतं निर्णायक ठरली. आप आणि काँग्रेस एकत्र असते तर कदाचित इथे केजरीवाल जिंकले असते.

आम आदमी पक्षात केजरीवाल यांच्या खालोखाल महत्त्वपूर्ण नेते असलेल्या मनीष सिसोदिया यांना जंगपुरा विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या तरविंदर सिंह मारवाह यांच्याकडून अवघ्या ६७५ मतांनी पराभूत व्हावे लागले. येथे तिसऱ्या क्रमांकावर राहिलेले काँग्रेसचे उमेदवार फरहाद सुरी यांना तब्बल ७ हजार ३५० मतं मिळाली. येथेही सिसोदिया यांच्या पराभवाच्या अंतरापेक्षा काँग्रेसला असलेल्या मतांची संख्या अधिक होती. तर मालवीयनगर मतदारसंघात आपचे सोमनाथ भारती यांना भाजपाच्या सतीष उपाध्याय यांच्याकडून २ हजार १३१ मतांनी पराभूत व्हावे लागले होते. येथेही काँग्रेसचे उमेदवार जितेंद्र कुमार कोचर यांना ६ हजार ७७० मतं मिळाली

याशिवाय दिल्लीतील राजेंद्रनगर मतदारसंघात आपच्या दुर्गेश पाठक यांना भाजपाच्या उमंग बजाज यांच्याकडून अवघ्या १२३१ मतांनी पराभूत व्हावे लागले. येथेही काँग्रेसला ४ हजार १५ मतं मिळाली. मतविभाजन झालं नसतं तर कदाचियत येथे आपचा उमेदवारा विजयी झाला असता. तसेच आपचे युवा नेते सौरभ भारद्वाज यांना ग्रेटर कैलाश मतदारसंघात भाजपाच्या शीखा रॉय यांच्याकडून ३ हजार १८८ मतांनी पराभूत व्हावे लागले. येथे काँग्रेसच्या उमेदवाराला ६ हजार ७११ मतं मिळाली. येथेही मतविभाजनाचा फटका आम आदमी पक्षाला बसला. 

याबरोबरच आणखी काही मतदारसंघांमध्ये आम आदमी पक्षाच्या उमेदवारांच्या पराभवाच्या अंतरापेक्षा काँग्रेसच्या उमेदवारांना मिळालेल्या मतांची संख्या अधिक आहे. त्यामुळे तिथेही दोन्ही पक्ष एकत्र असते तर काही फरक पडण्याची शक्यता होती. 

Web Title: Delhi Election 2025 Results: Congress lost in Delhi, but the equations changed as these big leaders of AAP played an important role in its defeat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.