तीन राज्ये, तीन निवडणुका अन् विरोधकांचे तीन आरोप...दिल्लीच्या निकालापूर्वी राजकारण तापले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 18:47 IST2025-02-07T18:46:53+5:302025-02-07T18:47:14+5:30
Delhi Election 2025 : दिल्ली विधानसभेसाठी एक्झिट पोलचे अंदाज आल्यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

तीन राज्ये, तीन निवडणुका अन् विरोधकांचे तीन आरोप...दिल्लीच्या निकालापूर्वी राजकारण तापले
Delhi Election 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या, म्हणजेच 8 फेब्रुवारीला जाहीर होणार आहे. दिल्लीत भाजपचे सरकार स्थापन होऊ शकते, असे एक्झिट पोल सांगत आहेत. दरम्यान, दिल्ली निकालापूर्वी विरोधकांनी यापूर्वी झालेल्या तीन राज्यांतील निवडणुकांबाबत भाजपवर आरोप करायला सुरुवात केली आहे. आम आदमी पार्टी कालपासून आरोप करत आहे की, त्यांच्या अनेक आमदारांना कोट्यवधी रुपये घेऊन पक्ष बदलण्याची ऑफर देणारे कॉल येत आहेत. या आरोपानंतर एलजी व्हीके सक्सेना यांनी लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरो (एसीबी) च्या चौकशीचे आदेश दिले.
दरम्यान, महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीला तीन महिने उलटले असताना राहुल गांधींनी आज पुन्हा पत्रकार परिषदेत बनावट मतदार जोडून निवडणुकांवर प्रभाव टाकल्याचा आरोप केला. दुसरीकडे, उत्तर प्रदेशातील मिल्कीपूरमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीनंतर समाजवादी पक्ष सातत्याने निवडणूक आयोगाला धारेवर धरत आहे.
राजकारण तापले
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर एक्झिट पोलचा डेटा येताच आम आदमी पार्टीने भाजपवर 15 कोटींची ऑफर दिल्याचा आरोप केला. त्यामुळे उपराज्यपालांच्या आदेशानुसार, आज एसीबीचे पथक केजरीवालांच्या निवासस्थानी चौकशीसाठी पोहोचले. पण, अरविंद केजरीवालांची भेट न झाल्यामुळे लाचलुचपतचे पथक नोटीस बजावून माघारी परतले.
राहुल गांधींचा काय आहे आरोप
दुसरीकडे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी, शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी राहुल गांधी म्हणाले की, आम्ही महाराष्ट्रातील मागील निवडणुका लढवलेल्या संपूर्ण विरोधकांचे प्रतिनिधित्व करत आहोत. आम्ही मतदार आणि मतदार याद्यांचा अभ्यास केला असून, अनेक अनियमितता आढळल्या आहेत. देशासाठी विशेषत: लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्या तरुणांनी या निष्कर्षांबाबत जागरूक राहून ते समजून घेणे महत्त्वाचे आहे. राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर टीका केली आणि निवडणूक आयुक्तांच्या निवडीचा मुद्दा उपस्थित केला. तसेच महाराष्ट्राच्या मतदार यादीतील गैरप्रकार गंभीर अनियमितता दर्शवितात, असेही म्हटले.
मिल्कीपूर पोटनिवडणूक
मिल्कीपूरमध्ये बेईमानी करण्यासाठी भाजपने सर्व प्रकारचे डावपेच अवलंबल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी केला. मिल्कीपूर पोटनिवडणुकीवर प्रभाव टाकण्यासाठी भाजपच्या गुंडांनी अराजकत निर्माण केली, त्यांना पोलिस-प्रशासनाकडून खुलेआम संरक्षण मिळत असल्याचे दिसून आले. पोलीस-प्रशासनाने भाजपच्या गुंडांना मोकळे हात देऊन निवडणूक आचारसंहितेचे घोर उल्लंघन केल्याचा दावा अखिलेश यांनी केला.