Delhi Election 2025 : भारतीय जनता पक्षाने तब्बल 27 वर्षांनंतर दिल्ली विधानसभा निवडणुकीत महाप्रचंड विजय मिळवला. भाजपला 48, तर आम आदमी पक्षाला फक्त 22 जागांवर समाधान मानावे लागले. विजयानंतर भाजपच्या गोटात सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. दिल्लीचा मुख्यमंत्री कोण होणार, याकडे दिल्लीतील सर्व नागरिकांच्या नजरा लागून आहे. विशेष म्हणजे, भाजपचा मुख्यमंत्री आप सरकारने बांधलेल्या 'शीशमहल'मध्ये राहणार का? असाही प्रश्न उपस्थित केला जातोय.
दिल्लीचा 'शीशमहल'निवडणूक प्रचारादरम्यान भाजपने शीशमहलचा मुद्दा उपस्थित करत अरविंद केजरीवालांना चांगलेच धारेवर धरले होते. याबाबत अनेक आरोपही करण्यात आले. अरविंद केजरीवालांनी मुख्यमंत्री असताना ते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या नूतनीकरणावर करोडो रुपये खर्च केल्याचा आरोप भाजपकडून झाला. तेव्हापासून भाजपने मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाला 'शीशमहल' असे नाव दिले. आता 27 वर्षांनंतर दिल्लीत भाजपचे सरकार आले आहे. अशा स्थितीत दिल्लीचे मुख्यमंत्रीही या 'शीशमहल'मध्ये राहणार का, असा प्रश्न सर्वांच्या मनात आहे.
काय म्हणाले भाजपचे दिल्ली अध्यक्ष?शीश महालाबाबत भाजप अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा म्हणतात की, भाजपचा मुख्यमंत्री शीशमहलमध्ये राहणार नाही. नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून अरविंद केजरीवालांचा पराभव करणारे भाजप नेते प्रवेश वर्मा यांनीही शीश महलमध्ये कोणीही राहू नये, असे म्हटले आहे. कोणताही मुख्यमंत्री शीशमहलमध्ये राहू शकत नाही, फक्त दुबईचे शेखच राहू शकतात, असे त्यांनी उपरोधिकपणे सांगितले. मुख्यमंत्र्यांसाठी एवढ्या मोठ्या निवासस्थानाची गरज नाही. मी पक्षाला सांगेन की, जो कोणी मुख्यमंत्री होईल, त्याने शीशमहलमध्ये राहू नये. त्या शीशमहलचे पर्यटन स्थळ, गेस्ट हाऊस किंवा आणखी काही बनवावे, असे ते म्हणाले.
33 कोटींचा शीश महाल?दिल्लीतील मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान म्हणजेच 'शीश महल' हे 6 प्लागस्टाफ रोड, सिव्हिल लाईन्स येथे आहे. कॅगच्या अहवालानुसार केजरीवाल यांनी या बंगल्याच्या नूतनीकरणासाठी एकूण 33 कोटी रुपये खर्च केले होते. 2023 मध्ये शीशमहालचे पडदे, कार्पेट आणि बाथरुमच्या नळांची किंमत सांगून भाजपने आपवर निशाणा साधला होता. यासाठी भाजपने आपवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.