नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणुकीत गेल्या वेळी नोंदवलेल्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा आम आदमी पार्टीचा मानस आहे. मात्र दिल्लीतील एका विधानसभा मतदारसंघात आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून आपल्याच पक्षाच्या आमदाराविरोधात पोस्टरबाजी करण्यात आली असल्याचे पाहायला मिळाले.
दिल्लीतील बादली विधानसभेत आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते त्यांच्याच पक्षाचे आमदार अजेश यादव यांच्यावर नाराज असल्याचे पाहायला मिळत आहे. तर या कार्यकर्त्यांनी आपच्या या आमदार विरोधात मतदारसंघात विविध ठिकाणी पोस्टरबाजी केली आहे. 'अजय यादव तेरी खैर नहीं केजरीवाल तुम से बैर नहीं' असा उल्लेख या पोस्टरमध्ये करण्यात आला आहे.
निवडणुका जाहीर झाल्यावर कार्यकर्त्यांची जाणीव नेत्यांना होत असते. दिल्लीतील विधानसभा निवडणुकीत सुद्धा सद्या अशीच जाणीव करून देण्याचे काम आपचे कार्यकर्ते करत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घेतलेली ही भूमिका चर्चेचा विषय ठरला आहे. तर आमदार यादव यांनी मतदारसंघाकडे गेली चार वर्षे दुर्लक्ष केल्याचा आरोप या कार्यकर्त्यांनी केला आहे.
आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मतदारसंघातील विविध ठिकाणी आमदार यादव यांच्याविरोधात पोस्टर लावली असून त्यांच्याबद्दलची नाराजी व्यक्त केली आहे. तर आमची नाराजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर नसून आमदार यादव यांच्याबद्दल असल्याचे सुद्धा त्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र आपच्या कार्यकर्त्यांकडून स्वपक्षाच्या आमदाराविरोधात पोस्टरबाजी करण्यात आली असल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे.