नवी दिल्ली - दिल्ली विधानसभेच्या निवडणुकांचे रणशिंग फुंकले गेले आहे. आम आदमी पक्ष संपूर्ण तर भाजप, आणि काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांनी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. तर आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल हे नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून रिंगणात उतरणार आहेत. मात्र अजूनही त्यांच्या विरोधात भाजप किंवा काँग्रेसला उमेदवार देता आला नाही.
विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच आम आदमी पक्षाने पहिल्याच फटक्यात सर्वच उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये विद्यमान 46 आमदारांना तिकिट देण्यात आले असून 15 आमदारांचा पत्ता कापण्यात आला आहे. त्यानंतर, आता काँग्रेसने 54 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्याच बरोबर भाजपने सुद्धा आपल्या 57 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.
विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाचे प्रमुख व मुख्यंमत्री अरविंद केजरीवाल हे पुन्हा एकदा नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. दुसरीकडे मात्र केजरीवाल यांच्याविरोधात काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाने अद्याप कोणताही उमेदवार निश्चित केलेला नाही. त्यामुळे केजरीवाल यांच्याविरुद्ध कोण रिंगणात असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख 21 जानेवारी असून, 22 जानेवारी रोजी अर्जाची छाननी केली जाईल. त्याचबरोबर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया 24 जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी 8 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीचे निकाल 11 फेब्रुवारी रोजी जाहीर होतील.