Delhi Election: भाजपावर नामुष्की? केजरीवालांविरोधात उमेदवार बदलणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 12:12 PM2020-01-21T12:12:01+5:302020-01-21T12:21:12+5:30
भाजपाने 17 जानेवारीला 57 उमेदवारांची पाहिली यादी जाहीर केली होती. यामध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात उमेदवार देण्यात आला नव्हता. सोमवारी रात्री उशिराने भाजपाने उर्वरित उमेदवारांची यादी जाहीर केली असून यामध्ये केजरीवालांविरोधात सुनील यादव यांना उमेदवारी दिली आहे.
नवी दिल्ली : आज नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात भाजपा आणि काँग्रेसने उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र, दोन्ही नवखे उमेदवार असल्याने केजरीवाल यांच्याविरोधात कोणी खमका उमेदवार मिळाला नाही का, यावरून भाजपावर टीका होऊ लागली आहे. मतदारांमध्ये चुकीचा संदेश जात असल्याने अखेर भाजपा हा उमेदवारच बदलण्याच्या विचारात असल्याचे सूत्रांनी सांगितले.
भाजपाने 17 जानेवारीला 57 उमेदवारांची पाहिली यादी जाहीर केली होती. यामध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात उमेदवार देण्यात आला नव्हता. सोमवारी रात्री उशिराने भाजपाने उर्वरित उमेदवारांची यादी जाहीर केली असून यामध्ये केजरीवालांविरोधात सुनील यादव यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, यादव हे केजरीवालांच्या तुलनेत अगदीच नवखे आहेत.
केजरीवालांच्या विरोधात भाजपा मोठ्या नेत्याला उभे करण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, यादव यांना उमेदवारी देण्यात आली. यामुळे भाजपाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनी यादव यांना बोलावले आहे. यामुळे त्यांची उमेदवारी बदलून दुसऱ्या वजनदार नेत्याला देण्यात येण्याची शक्यता आहे. सुनील यादव भाजयुमोचे प्रदेश अध्यक्ष आहेत. तसेच गेल्या काही वर्षांपासून नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघात सक्रीयही आहेत. मात्र, तरीही भाजपाचे नेते त्यांच्या नावावर सहमत नाहीत. दिल्ली जिंकायची असेल तर केजरीवाल यांच्याविरोधात मोठे नाव असणे गरजेचे या नेत्यांना वाटत आहे.
केजरीवालांविरोधात भाजपाने उभा केला उमेदवार; दुसरी यादी जाहीर
भाजपाला मोठा धक्का; शिवसेनेनंतर आणखी एका पक्षाने 21 वर्षांची साथ सोडली
भाजपाने उर्वरित 10 जागांवर तेजिंदर पाल सिंह बग्गा यांना हरीनगर, नांगलोई जाटहून सुमनलता शौकीन, राजौरी गार्डनहून रमेश खन्ना, नवी दिल्लीहून सुनील यादव, शाहदराहून संजय गोयल, कृष्णानगरहून अनिल गोयल, महरौलीहून कुसुम खत्री, कालकाजीहून धर्मवीर सिंह आणि कस्तूरबानगरहून रविंद्र चौधरी यांना तिकीट देण्यात आले आहे. तर दिल्लीमध्ये युतीमुळे दोन जागा जदयूला देण्यात आल्या आहेत. यामध्ये संगम बिहार आणि बुराडी या जागा आहेत. तर एक जागा लोजपाला देण्यात आली आहे.