१० Exit Poll, सर्वात एक गोष्ट कॉमन; राजधानी दिल्लीत काँग्रेसला मिळणार गुड न्यूज
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 08:31 IST2025-02-06T08:30:56+5:302025-02-06T08:31:24+5:30
२०१३ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस मजबुतीने उतरली होती. त्यांना २४.३ टक्के मतांसह ८ जागांवर विजय मिळाला होता.

१० Exit Poll, सर्वात एक गोष्ट कॉमन; राजधानी दिल्लीत काँग्रेसला मिळणार गुड न्यूज
नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मतदान पार पडले. यानंतर अनेक माध्यमांनी एक्झिट पोलचे आकडे समोर आणलेत. दिल्लीतील १० पैकी ८ एक्झिट पोलमध्ये भाजपा चांगली कामगिरी करताना दिसतेय किंवा ते सरकार बनवतील असा अंदाज आहे. त्याशिवाय २ एक्झिट पोलमध्ये आम आदमी पार्टीला बहुमत मिळाल्याचा अंदाज आहे. त्या सर्व एक्झिट पोलमध्ये काँग्रेससाठी गुड न्यूज दिसून येते.
मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला केवळ ४.३ टक्के मते मिळाली होती. यावेळी जितके एक्झिट पोल समोर आलेत त्यातील सर्वांमध्येच काँग्रेसच्या मतांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अनेक एक्झिट पोलने काँग्रेसला ३ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे. SAS ग्रुपचा जो एक्झिट पोल समोर आला आहे. त्यात काँग्रेसला मिळालेली मते १० टक्क्यांपर्यंत असू शकतात, त्याशिवाय एक ते तीन जागा काँग्रेसच्या वाट्याला येतील असा अंदाज सांगितला आहे.
People's Insight च्या एक्झिट पोलमध्ये काँग्रेस खाते उघडणार असं सांगण्यात आले आहे. तसेच काँग्रेसच्या मतांमध्येही वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे. पोल डायरीने त्यांच्या एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला २ जागा देताना दिसतात. दिल्लीत काँग्रेसच्या मतांच्या टक्केवारीत वाढ होऊन ९.१७ टक्के मते मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे. P Marq Data च्या एक्झिट पोलमध्ये काँग्रेसची मतांची टक्केवारी दुप्पट होताना दिसते. काँग्रेसला गेल्या वेळपेक्षा यंदा ९ टक्क्यांच्या आसपास मते मिळू शकतात आणि १ जागा विधानसभेत जिंकू शकते असा अंदाज वर्तवला आहे.
चाणक्य आणि JVC नेही दाखवली आशा
चाणक्य स्ट्रॅटर्जीच्या एक्झिट पोलमध्ये काँग्रेसची मतांची टक्केवारी अडीच पटीने वाढवल्याचं म्हटलं आहे. मागील वेळी ४ टक्के मते काँग्रेसला मिळाली होती. यावेळी काँग्रेसच्या वाट्याला १० टक्के मते मिळू शकतात आणि १-३ जागा काँग्रेस जिंकू शकते असं म्हटलं आहे. JVC एक्झिट पोलमध्ये भाजपा सरकार बनवेल असं सांगितले असले तरी याही एक्झिट पोलमधून काँग्रेससाठी गुड न्यूज आहे. ती म्हणजे जेवीसी एक्झिट पोलनुसार काँग्रेस २ जागांवर विजयी होऊ शकते असं म्हटलं आहे.
मागील ३ निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी कशी?
२०२० च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला केवळ ४.३ टक्के मते मिळाली होती. त्याआधीच्या २०१५ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या मतांची टक्केवारी ९.३ टक्के इतकी होती. या दोन्ही निवडणुकीत काँग्रेसला विधानसभेत खाते उघडता आले नाही. २०१३ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस मजबुतीने उतरली होती. त्यांना २४.३ टक्के मतांसह ८ जागांवर विजय मिळाला होता.