नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात राजकीय पक्षांनी एकमेकांवर चिखलफेक करण्याची कुठलीही संधी सोडली नाही. आरोप-प्रत्यारोपांच्या या मालिकेत मतदारांना आकर्षित करण्यासाठीही सर्वच पक्षांनी आतोनात प्रयत्न केले. आता, प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर मतदानप्रक्रियेकडे सर्वांचीच ओढ लागली आहे. बुथ कंट्रोलिंगसाठी सर्वच राजकीय पक्षांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यात, एका कार राईड कंपनीने मतदारांना मोफत सेवा देण्याची घोषणा केली आहे.
संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता संपला असून मतदानासाठी काऊंटडाऊन सुरू झाले आहे. शनिवारी (८ फेब्रुवारी) सकाळी ८ ते सायंकाळी ६ या वेळेत दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी मतदान होईल. या मतदानासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावे, या उद्देशाने बाईक आणि टॅक्सी बुकींग अॅप Rapido तर्फे मतदारांना मोफत सेवा देण्यात येत आहे. मतदान बुथ केंद्रावर जाण्यासाठी मतदारांना ही सेवा मिळणार आहे.
रॅपिडो कॅब सर्व्हीस कंपनीकडून 3 किमी अंतरावरील बुथ केंद्रावर ही मोफत सेवा मतदारांना पुरविण्यात येत आहे. दिल्लीतील सगळ्याच मतदारसंघात 3 किमी अंतरावरील बुथ केंद्रावर 100 टक्के मोफत राईड देण्यात येणार आहे. निवडणूक ही महत्वपूर्ण प्रकिया असून लोकशाही व संविधानाच मूळ आहे. त्यामुळे, समाजासाठी आपलं योगदान देण्याच्या उद्देशाने कंपनीकडून ही मोफत सेवा देण्यात येत असल्याचं रॅपिडो कंपनीचे सह-संस्थापक अरविंद सांका यांनी म्हटलंय. कंपनीच्या अॅपवरुन 'Code IVOTE' हा ऑफर कोड सिलेक्ट केल्यानंतर ग्राहकांना या सेवेचा सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत लाभ मिळणार आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी जवळपास १ कोटी ४६ लाख मतदारांच्या हातात उमेदवारांचे भवितव्य आहे. यातील ८० लाख ५५ हजार पुरुष व ६६ लाख ३५ हजार महिला मतदार आहेत.७० मतदारसंघांमध्ये २६८८ मतदान केंद्रांची व्यवस्था आयोगाने केली आहे. यातील ५१६ मतदान केंद्रांना अतिसंवेदनशील श्रेणीत ठेवण्यात आले आहे. ११ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.